प्रतिनिधी/ सातारा
केलेल्या कामाच्या बिल मंजूर करून ते वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यासाठी दोन टक्के प्रमाणे 95 हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा मृद व जलसंधारणचे कार्यकारी अभियंता सतीश पंचप्पा लंब्बा (वय 48, मूळ रा. सिद्धेश्वर पेठ सोलापूर, सध्या रा. सदरबझार, सातारा) हे मंगळवारी 92 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद अडकले.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आलेली माहिती अशी, सतीश पंचप्पा लंब्बा यांनी तक्रारदाराने केलेल्या कामाचे बिल मंजूर करून ते वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यासाठी तक्रारदाराकडे दोन टक्के प्रमाणे 92 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार केली. प्राप्त झालेल्या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दि. 28 जुलै रोजी पडताळणी केली असता तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यानंतर पथकाने मंगळवारी सातारा येथील मृद व जलसंधारण विभागात सापळा लावला असता तक्रारदाराकडून 92 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सतीश पंचप्पा लंब्बा अलगद जाळ्यात अडकले.
या कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन अंकुश राऊत, पोलीस नाईक राजे काटकर, पोलीस कॉन्स्टेबल येवले, भोसले यांनी सहभाग घेतला.