ऑनलाईन टीम / मुंबई :
जळगावातील महिला वसतीगृहात महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्यानंतर मोठी खडाजंगी सभागृहात पाहायला मिळाली होती. त्यानंतर काल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्चस्थरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत केल्याची माहिती दिली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला असून असा कोणताही प्रकार तेथे घडला नसल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
अनिल देशमुख म्हणाले, जळगावमध्ये मुलींना वसतिगृहात कपडे काढून पोलीसांनी नाचायला लावले असे काही आरोप झाले. काही व्हिडीओ व्हायरल झाले. यासंदर्भात सहा वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांची कमिटी तयार करण्यात आली होती.
पुढे ते म्हणाले, 41 जणांची साक्ष झाली. त्या घटनेत कोणतेही तथ्य नाही. 20 फेब्रुवारीला एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला. तेव्हा गरब्याला घालतात तसा झगा महिलेने घातला होता. तिला त्याचा त्रास होत होता म्हणून तिने काढून ठेवला. ज्या महिलेने तक्रार केली तिचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची तक्रार त्या महिलेच्या नवर्याने अनेकदा केली आहे. त्यामुळे त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही.
वसतीगृहात एकही पोलीस अधिकारी वसतीगृहात गेल्याची रजिस्टमध्ये नोंद नाही. महिलांचा व्हिडीओ काढला गेला, अशीही कोणती माहिती अहवालात समोर आली नाही, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.