ऑनलाइन टीम / जळगाव :
शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचे आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास जळगावात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामुळे येथे मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती आणि या अतिरिक्त गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन दोन महिला पदाधिकारी जखमी झाल्या.
उद्धव ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात जळगाव जिह्यातील जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच जळगावात दाखल झाले.
गुलाबराव पाटील हे रेल्वे स्थानकातून बाहेर पडत असताना कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यात कार्यकर्त्यांच्या गराडय़ात अडकलेल्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मंगला बारी आणि शोभा चौधरी या जखमी झाल्या. दरम्यान दोघींना कार्यकर्त्यांनी सुखरूप बाहेर काढले.