प्रतिनिधी /बेळगाव
सांबरा एअरफोर्समधील एका जवानाने स्वतःवर गोळय़ा झाडून घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. या घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही. आत्महत्या करणारा जवान मूळचा हरियाणा येथील राहणारा होता.
संदीपकुमार (वय 27) असे त्याचे नाव आहे. सांबरा एअरफोर्समध्ये गेल्या 9 वर्षांपासून तो कार्पोरल म्हणून सेवा बजावत होता. सोमवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास सेवेत असताना इन्सास रायफलमधून गळय़ावर गोळय़ा झाडून घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
गोळीबाराचा आवाज येताच एअरफोर्स परिसरात एकच धावपळ उडाली.
घटनेची माहिती समजताच मारिहाळचे पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. संदीपकुमारचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात ठेवण्यात आला आहे. हरियाणा येथील त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.
यासंबंधी मारिहाळ पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांचे कुटुंबीय बेळगावात आल्यानंतर पुढील सोपस्कर पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. आत्महत्येचे निश्चित कारण सध्या स्पष्ट झाले नसले तरी कौटुंबिक कारणामुळे ही घटना घडली असावी, असा संशय अधिकाऱयांनी व्यक्त केला असून कुटुंबीय बेळगावात आल्यानंतरच यासंबंधी अधिक माहिती मिळणार आहे.