पोलीस प्रशासनाची कारवाई, आर. सी. च्या म्होरक्यासह 10 जणांवर कारवाई
प्रतिनिधी/कोल्हापूर
खून, मारामाऱया, खंडणी, दरोडा यासह दखल आणि अदखलपात्र 45 गुन्हे दाखल असणाऱया आर. सी. गँगवर कोल्हापूर पोलीस दलाने मोका अंतर्गत कारवाई केली. आर. सी. गँगच्या 10 जणांवर ही कारवाई करण्यात आली. रवि सुरेश शिंदे, प्रदीप रामचंद्र कदम (वय 25) , संदीप मोतीराम गायकवाड, जावेद इब्राहीम सैय्यद, सागर सुरेश जाधव (वय 30), प्रकाश कुबेर कांबळे, अक्षय उर्फ आकाश अशोक कदम, अजय सुनिल माने (वय 28), योगेश मानसिंग पाटील, विकी माटूंगे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
आर. सी. गँगवर शहर व जिल्हा परिसरात खून मारामारी, खूनाचा प्रयत्न, दरोडा, दरोडय़ाचा प्रयत्न, बदला घेणे, गंभीर दुखापत, साधी दुखापत, प्राणघातक शस्त्र तस्करी, गर्दी जमवून मारामारी यासह 37 दखलपात्र तर 8 अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. तसेच 22 सफ्टेंबर 2021 रोजी भास्कर डॉन गँगचा म्होरक्या अमोल भास्कर याच्यासह साथीदारांवर तटाकडील तालीम येथे जिवघेणा हल्ला करण्यात आला. पाठलाग करुन त्याच्यावर सशस्त्र प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा हल्ला जवाहरनगर पसिरातील वर्चस्ववाद आणि आर्थिक उत्पन्न यातूनच आर. सी. गँगने केल्याचे तपासात समोर आले. यामुळे जुना राजवाडा पोलीसांनी रवि शिंदे, प्रदीप कदम, संदीप गायकवाड, जावेद सैय्यद, सागर जाधव, प्रकाश कांबळे, अक्षय उर्फ आकाश कदम, अजय माने, योगेश पाटील, विकी माटूंगे यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी आर. सी. गँगवर मोका अंतर्गत कारवाई करावी असा प्रस्ताव तयार करुन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठवला होता. याला शुक्रवारी रात्री मंजूरी देण्यात आली. संशयीत 10 जण सध्या कळंबा कारागृहात असून लवकरच त्यांना मोका अंतर्गत अटक करण्यात येणार आहे. याचा तपास जयसिंगपूरचे पोलीस उपअधिक्षक रामेश्वर बेंजने करणार आहेत.
आर. सी. गँगच्या संघटीत गुन्हेगारीस बळी पडलेल्या नागरीकांनी निर्भयपणे पुढे यावे. संबंधीत पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी असे आवाहन पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. तसेच आणखीन काही गुन्हेगारी टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले.