गुवाहाटी / वृत्तसंस्था
स्ट्रेस प्रॅक्चरमधून सावरल्यानंतर जसप्रित बुमराहने शुक्रवारी सराव सत्रात जोरदार सराव केला. उद्या (रविवार दि. 5) यजमान भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध गुवाहाटीत पहिली टी-20 लढत खेळत आहे. त्या पार्श्वभूमीवर, अन्य भारतीय खेळाडूंनीही कसून सरावावर भर दिला.
बुमराहच्या सरावाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बारकाईने निरीक्षण केले. लंकन खेळाडूंनी यावेळी पूर्ण दिवस विश्रांती घेणे पसंत केले.
बुमराहने यॉर्कर, बाऊन्सर्ससह वैविध्य आणत शार्दुल ठाकुर व शिवम दुबे यांच्यासह गोलंदाजीचा सराव केला. याशिवाय, एकच स्टम्प रोवून गोलंदाजी करत त्याने आणखी अचूकता आणण्यावरही भर दिला. प्रत्येक चेंडू टाकल्यानंतर बुमराह संघाच्या थिंक टँकमधील सदस्यांशी चर्चा करताना दिसून आला. जवळपास 45 मिनिटे त्याने येथे गोलंदाजी केली.
विराट कोहली, बुमराह, केएल राहुल, श्रेयस अय्यर नंतर उंच झेल घेण्याचा सराव करत होते. शिखर धवन, रविंद्र जडेजा, नवदीप सैनी, कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल हे भारताच्या या ऐच्छिक सराव सत्रात दिसून आले नाहीत.
पाठीच्या दुखापतीमुळे तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ व्यावसायिक क्रिकेटमधून बाहेर रहावे लागल्यानंतर लंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेसाठी आता बुमराहचे पुनरागमन होत आहे. 2019 चे वर्ष चांगलेच गाजवलेल्या बुमराहने 3 कसोटीत 13.14 च्या सरासरीने 14 बळी घेतले. यापैकी विंडीजविरुद्ध नॉर्थ साऊंड व किंग्स्टन येथे डावात पाच बळी घेण्याचा दोनवेळा पराक्रम करत तो दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व विंडीजमध्ये अशी कामगिरी करणारा एकमेव आशियाई गोलंदाज ठरला. याशिवाय, वर्षभरात त्याने 14 वनडेत 25 बळीही घेतले.
यादरम्यान, बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक झळकावणारा केवळ तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी, हरभजन सिंग व इरफान पठाण यांनी असा पराक्रम गाजवला होता. गुवाहाटीतील स्टेडियमवर आतापर्यंत दोन आंतरराष्ट्रीय सामने झाले असून यातील शेवटची लढत दि. 21 ऑक्टोबर 2018 रोजी झाली होती. त्यावेळी भारताने विंडीजच्या 323 धावांचा यशस्वी पाठलाग केला. पण, 10 ऑक्टोबर 2017 रोजी या मैदानावरील पहिल्या लढतीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी संतप्त चाहत्यांनी हॉटेलकडे परतणाऱया भारतीय संघाच्या बसभोवती गराडाही घातला होता.