प्रतिनिधी / केपे
जांबावली येथील श्री रामनाथ दामोदर संस्थानच्या कार्यकारी समितीने कोरोनाविरुद्धच्या कार्यात योगदान देताना नुकतीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री निधीसाठी 3,33,333 रुपयांचा धनादेश त्यांना प्रदान केला. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रकाश कुंदे, मुखत्यार प्रसाद अग्नी, सचिव संदेश कुंदे व खजिनदार प्रशांत हेगडे हजर होते.
दरम्यान, सांगे परिसरातील 450 घरांना लॉकडाऊनच्या काळात साहाय्य करण्याच्या उद्देशाने समितीने सुमारे 1 लाख रुपये किमतीच्या जीवनावश्यक वस्तू याआधीच सांगेच्या मामलेदार कार्यालयाकडे सुपूर्द केलेल्या आहेत. देवस्थान समित्यांनी अशा प्रकारच्या मदतकार्यात नेहमीच सरकारला सहकार्य केले पाहिजे. त्याच भावनेतून आम्ही नेहमी कार्य करत आलो आहोत व यापुढेही गरजेनुसार आणि आपल्या पूर्ण क्षमतेने ही समिती असे कार्य पुढे नेईल, असे अध्यक्ष प्रकाश कुंदे यांनी सांगितले.