वार्ताहर / जांबोटी
जांबोटी परिसरात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार दि. 17 ते 24 मे पर्यंत सात दिवस जांबोटी बाजारपेठ संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या जांबोटी ग्रा. पं. व नागरिकांच्या बैठकीत ग्रा. पं. अध्यक्ष महेश गुरव हे होते.
जांबोटी हे खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील व्यापारीदृष्टय़ा महत्त्वाचे गाव आहे. तसेच या ठिकाणी सरकारी कामकाज, बाजार व्यवहार तसेच इतर कारणासाठी या परिसरातील सुमारे 25 ते 30 गावातील नागरिकांचा सतत संपर्क असतो. या ठिकाणी कर्नाटक, गोवा तसेच महाराष्ट्र आदी परराज्यातून येणाऱया प्रवाशांची देखील सतत वर्दळ असल्यामुळे या गावाला कोराना प्रादुर्भावाचा वाढता धोका निर्माण झाला आहे. सध्या कर्नाटकमध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आल्यामुळे जांबोटी येथे सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी परिसरातील नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. ग्रा. पं. ने निर्बंध लादून देखील नागरिक या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दी करीत असल्याने कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील अनेक गावात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गावात कोरोनाचा होणार फैलाव रोखण्यासाठी जांबोटी गावात सोमवार दि. 17 मे पासून ते 24 मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय ग्राम पंचायतीने घेतला असून या काळात किराणा दुकानांसह सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल व दैनंदिन व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत. केवळ वैद्यकीय सुविधा व औषध दुकाने तेवढीच सुरु राहणार असून नागरिकांनी कडक लॉकडाऊनच्या काळात खरेदीसाठी बाहेर पडू नये व कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ग्राम पंचायतीला सहकार्य करावे असे व पीडीओ उदयकुमार शिवापूरे यांनी केले आहे.