पाच गावातील दहा खोल्यांसाठी प्रत्येकी 11 लाख : भूमिपूजनाने कामाचा शुभारंभ
वार्ताहर / कणकुंबी
कणकुंबी भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने शाळांच्या इमारतीचे काम पुन्हा-पुन्हा हाती घ्यावे लागते. या भागातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शाळा इमारतींना नाबार्ड योजनेतून जांबोटी-कणकुंबी भागातील कालमणी, तोराळी, कणकुंबी, पारवाड आणि बेटणे या पाच गावातील एकूण दहा खोल्यांसाठी 1 कोटी 10 लाख रुपये मंजूर झाले असून मंजूर सदर इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते नुकताच पार पडला.
यामध्ये पहिल्या टप्प्यात नाबार्ड योजनेतून तोराळी येथील प्राथमिक शाळेच्या तीन खोल्यांसाठी 36 लाख रुपये तसेच कणकुंबी, कालमणी आणि पारवाड येथील प्रत्येकी दोन-दोन खोल्यांसाठी 22 लाख तर बेटणे शाळेच्या एका खोलीसाठी 11 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार अंजली निंबाळकर यांनी पहिल्या टप्प्यातील या पाच गावच्या 10 खोल्यांसाठी प्रत्येकी 11 लाख रुपयेप्रमाणे एकूण 1 कोटी 10 लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. सदर शाळांच्या इमारतीचे बांधकाम चांगले व्हावे, यासाठी संबंधित शाळांच्या एसडीएमसी कमिटी, शिक्षक आणि पंचकमिटीने विशेष लक्ष द्यावे तसेच गावातील कोणत्याही अडीअडचणींसंदर्भात राजकारण बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकत्र येऊन विकास करून घ्यावा, आपल्या समस्या सोडविण्यासाठी आमदार या नात्याने मी सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन आमदार अंजली निंबाळकर यांनी कालमणी येथे शाळा खोलीच्या भूमिपूजनप्रसंगी केले.
तोराळी, कालमणी, बेटणे, कणकुंबी आणि पारवाड येथील शाळांच्या नुतन खोलींच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संबंधित विविध शाळांमध्ये पार पडला. कालमणी येथे आमदार निंबाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडल्यानंतर शाळेच्या आणि ग्रामस्थांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी जि. पं. उपविभागीय अभियंता भरमा गुडगेनट्टी, आमटे ग्रा. पं. विकास अधिकारी एम. एम. मोकाशी, जांबोटी केंद्र संपन्मूल अधिकारी आर. बी. गावडे, शाळा सुधारणा मंडळ अध्यक्ष हणमंत नाईक, शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका आर. आर. नाईक व शिक्षक वर्ग, शाळा कमिटीचे माजी अध्यक्ष संतोष कदम, संतोष शिंदे, विजय भरणकर, ग्रा. पं. माजी अध्यक्ष बाबुराव भरणकर व ग्रामस्थ उपस्थित होते. पत्रकार सुनील चिगुळकर यांनी प्रास्ताविक केले.