सात तोळी सोन्याचे दागिने व दोन हजार रुपये लंपास
वार्ताहर/ जांबोटी
जांबोटी -वडगाव येथे अज्ञात चोरटय़ांनी बंद घराचा मागील दरवाजा फोडून सात तोळे सोन्याचे दागिने व दोन हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. भरदिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे वडगाव ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.
अधिक माहिती अशी की, वडगावचे रहिवासी परशराम दत्तात्रय शिर्के यांचे गावाबाहेर गणेश मंदिरानजिक मुख्य रस्त्यावर घर आहे. ते भारतीय सैन्य दलात सेवा बजावतात. गेल्या काही दिवसापूर्वी ते सुट्टीवर आले आहे. शुक्रवारी दुपारी काही कामानिमित्त शिर्के पती पत्नी बेळगावला गेली होती. त्यांची आई घरी होती. परंतु शुक्रवारचा दिवस असल्यामुळे गावकऱयांनी वार पाळणूक करून पडल्या भरण्याचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे घराचे सर्व दरवाजे बंद करून त्यांची आई महाप्रसादासाठी घराबाहेर गेल्या होत्या त्या संधीचा लाभ घेऊन चोरटय़ांनी त्यांच्या घराचा मागील दरवाजा फोडून घरात प्रवेश केला व घरातील तिजोरी फोडून सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने व रोख दोन हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्यामुळे परशराम दत्तात्रय शिर्के यांचे सुमारे साडे तीन लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे. कार्यक्रम अटोपून तासाभराने घरी परत आल्यानंतर शिर्के यांच्या आईला आपल्या घरात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. परंतु तो पर्यंत चोरटय़ांनी तेथून ऐवजासह पोबारा केला. भरदिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे वडगाव ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.
परशराम शिर्के यांनी शुक्रवारी सायंकाळी बेळगावहून परत आल्यानंतर आपल्या घरी चोरी झाल्याची तक्रार खानपूर पोलीस स्थानकात दिली. शनिवारी सकाळी खानापूरचे पोलीस निरिक्षक बसनगौडा पाटील व त्यांच्या सहकऱयांनी वडगावला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी पुढील तपास चालविला आहे.