तालुक्यातील पहिलाच उपक्रम : मंजुनाथ ट्रस्टतर्फे आयोजन
वार्ताहर / कणकुंबी
आपल्या संस्कृतीमध्ये आई-वडील, गुरु आणि अतिथी देवासमान आहेत. त्यांचा आदर करणे आपले कर्तव्य आहे. संस्कृत सर्व भाषांची जननी आहे. संस्कृत आपल्या संस्कृतीची भाषा, धर्माची भाषा आहे. परंतु आज इंग्रजांनी लादलेली आंग्ल भाषा बोलण्यामध्ये आपण धन्यता मानतो. भाषा शिकणे अयोग्य ठरू शकत नाही. परंतु आपल्या भाषेला, संस्कृतीला महत्त्व देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. ज्या विद्येतून विनय मिळतो ती विद्या आत्मसात केली पाहिजे. कारण धर्म हे कर्मावर अवलंबून आहे. कर्माचे फळ म्हणजे आपण जे करतो ते आपल्याला मिळते, म्हणून प्रामाणिकपणे मिळालेल्या व्यवहारातून धर्माचे काम केले पाहिजे, हीच आपली संस्कृती आहे. ती जाणून घेण्यासाठी संस्कृत भाषा अवगत होणे गरजेचे आहे, असे मत संस्कृत भाषापंडित आचार्य रविंद्रजी शास्त्री यांनी व्यक्त केले.
संस्कृतचे गाढे अभ्यासक आचार्य संस्कृत पंडित रविंद्रजी शास्त्री हे जांबोटी येथील विश्व भारत सेवा समितीच्या माध्यमिक विद्यालयात सुरू करण्यात येणाऱया संस्कृतवर्गाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी होते. खानापूर तालुक्मयात पहिल्यांदाच संस्कृत वर्ग सुरू करण्याचा उपक्रम जांबोटी विद्यालयातून होत आहे.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. जांबोटी विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कणकुंबी माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चिगुळकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. संस्कृत वर्गाचे आयोजन करून जांबोटी मंजुनाथ ट्रस्टचे प्रमुख अरुण महाराज कणगुटकर तसेच संस्कृत पंडित आचार्य रविंद्रजी शास्त्री, स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघाचे नवनिर्वाचित संचालक संतोष भेंडीगेरी व सुभाष होनगेकर, सुरेंद्र देसाई यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
यावेळी परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, निवृत्त प्राचार्य सुरेंद्र देसाई यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला जांबोटी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एस. एम. साखळकर तसेच सेवानिवृत्त कर्मचारी वसंत गोवेकर, कराड येथील डॉ. रमेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश सडेकर यांनी केले तर तुकाराम सडेकर यांनी आभार मानले. सोमवारपासून जांबोटी माध्यमिक विद्यालयामध्ये आचार्य संस्कृत पंडित रविंद्रजी शास्त्री यांचे संस्कृतचे वर्ग सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत सुरू होणार आहेत.