मूडीज इन्वेस्टर सर्व्हिस संस्थेने नोंदवले मत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढला असून भारतासह जगातील अर्थव्यवस्थेला रुळावर येण्यासाठी 2022 साल उजाडावे लागेल असे मत मूडीज इन्वेस्टर सर्व्हिस संस्थेने नोंदवले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हीड-19 महामारीची घोषणा मार्च 2020 मध्ये केली आणि त्यानंतर भारतासह सर्वच अर्थव्यवस्थेवर मोठा घाला घातला गेला. अनेक व्यवसाय, कारखाने, शिक्षणसंस्था, दळणवळण व्यवस्था, दैनंदिन व्यवहारांवर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाल्याने अर्थातच त्याची झळ भारतासह विविध देशांच्या अर्थव्यवस्थेला बसली.
भारताने अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आर्थिक पॅकेज योजना वेळोवेळी राबवल्या होत्या. कोरोना लॉकडाऊन काळामध्ये सर्वात मोठा फटका संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेला झेलावा लागला. एकंदर पाहता कोरोना पुन्हा आपले पाय पसरू लागला असल्याने देशासह जगभरातील अर्थव्यवस्था प्रत्यक्षात 2022 मध्ये रुळावर येऊ शकते असा अंदाज मूडीज यांनी व्यक्त केला आहे. सध्याला हळुवारपणे अर्थव्यवस्था गती घेताना दिसणार आहे.
लसीकरणाला वेग गरजेचा
कोरोना लसीकरणाने वेग घेतल्यास अर्थव्यवस्था गतीने मार्गस्थ होईल असेही मुडीजने म्हटले आहे. जगातील इतर देशही लसीकरणाच्या प्रक्रियेसाठी धडपडताना दिसत आहेत. सध्याच्या परिस्थितीत उद्योग, व्यवसाय पूर्ववत झाले असून आता लसीकरण प्रक्रियेला वेग देणे आवश्यक ठरणार आहे.