नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचे आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची नियुक्ती जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) कार्यकारी अध्यक्षपदी करण्यात आली आहे. ते 22 मे या दिवशी हा पदभार स्वीकारतील. सध्या जग कोरोना विषाणूच्या संकटात सापडले असताना भारताला हे पद मिळत आहे, हे महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे.
भारताच्या कोरोनाविरूद्धच्या संघर्षात डॉ. हर्षवर्धन केंद्रीय आरोग्यमंत्री या नात्याने अग्रभागी आहेत. हे मानाचे पद त्यांना मिळणे न्यायोचित आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी अध्यक्षपद एक वर्षासाठी असून गेल्यावर्षी ते जपानकडे होते. 22 मे ला होणाऱया संघटनेच्या संचालक मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान आता डॉ. हर्षवर्धन भूषविणार आहेत.