ऑलिम्पिकमधील कामगिरीमुळे तब्बल १४ स्थानांची प्रगती
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी एकमेव सुवर्णपदक मिळविणाऱ्या नीरज चोप्राने आता जागतिक मानांकनात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली असून ऑलिम्पिकमधील कामगिरीमुळे त्याने तब्बल १४ स्थानांची प्रगती केली आहे.
२३ वर्षीय चोप्राने जर्मनीचा ऍथलेट जोहान्नेस व्हेटरनंतर दुसरे स्थान मिळविले आहे. वर्ल्ड ऍथलेटिक्सने जाहीर केलेल्या ताज्या मानांकनात व्हेटरने १३९६ गुण घेत पहिले स्थान मिळविले आहे तर चोप्राचे १३१५ गुण झाले आहेत. ऐतिहासिक सुवर्ण जिंकून स्टार बनलेल्या चोप्राची टोकियोतील कामगिरी ही या ऑलिम्पिकमधील १० सर्वोत्तम संस्मरणीय क्षणांपैकी एक असल्याचे वर्ल्ड ऍथलेटिक्सने जाहीर केले. ‘नीरजचे समर्थक त्याला आधीपासूनच ओळखत होते. पण ऑलिम्पिकमधील भालाफेकमध्ये जेतेपद पटकावत भारताला ऍथलेटिक्समध्ये पहिल्यांदाच सुवर्ण जिंकून देण्याचा इतिहास घडविल्यानंतर त्याची लोकप्रियताही आकाशाइतकी प्रचंड वाढली आहे,’ असे वर्ल्ड ऍथलेटिक्सने आपल्या वेबसाईटवरील लेखात म्हटले आहे.
इन्स्टाग्रामवर नीरजचे ऑलिम्पिक आधी १,४३,००० फॉलोअर्स होते. पण त्यात आता प्रचंड वाढ झाली असून ती ३.२ दशलक्षावर पोहोचली आहे. यामुळे तो ट्रक अँड फिल्डमधील जागतिक स्तरावर सर्वाधिक फॉलो होणारा ऍथलेट बनला आहे. इथवर पोहोचण्यासाठी समर्थन व सदिच्छा दिलेल्या भारतीय व जागतिक स्तरावरील सर्व चाहत्यांचे नीरजनेही आभार मानले आहेत. आता वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकण्याचे लक्ष्य त्याने ठेवले आहे.
भालाफेक प्रशिक्षक हॉन मायदेशी परतणार
माजी विश्वविक्रमवीर व राष्ट्रीय भालाफेक प्रशिक्षक उवे हॉन यांचा ऑलिम्पिकपर्यंतचा करार संपुष्टात आला असून ते आता जर्मनीला परतणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ५९ वर्षीय हॉन यांना नोव्हेंबर २०१७ मध्ये नीरज चोप्रासह शिवपाल सिंग, अन्नू रानी यांना प्रशिक्षण देण्यासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून करारबद्ध करण्यात आले होते.
हॉन यांच्याशी केलेला मूळ करार तब्बल १.९० कोटी रुपयांचा होता. शिवाय, बोर्डिंग, लॉजिंग, वैद्यकीय सुविधा, प्रवास खर्च अतिरिक्त दिले जात होते. मात्र, ऑक्टोबर २०२० मध्ये कराराचे नुतनीकरण करताना त्यांनी वर्षाकाठी १.६४ कोटी रुपये मानधनाची मागणी केली होती. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने त्यांची ही मागणी मान्य करता येणार नसल्याचे कळवले होते. प्राधिकरणाने त्यानंतर बायोमेकॅनिक्स तज्ञ डॉ. क्लॉज बार्टोनिएत्झ यांना करारबद्ध केले. अलीकडे वर्षभर चोप्राला क्लॉज हेच मार्गदर्शन करत होते. अर्थात, हॉन यांच्याकडून मूलभूत बाबी आत्मसात केल्यानंतर चोप्रानेच क्लॉज यांच्याकडून मार्गदर्शन घेणे अधिक पसंत केले होते.