न्यूयॉर्क
जागतिक स्तरावरील खाद्यान्नाचे दर हे गेल्या 10 वर्षाच्या स्तरावर सर्वाधिक उच्चांकावर पोहचले असल्याची माहिती संयुक्त राष्ट्राच्या खाद्य आणि कृषी संघटनेकडून देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात खाद्यान्नाचे दर हे 30 टक्के इतके वाढले असल्याची माहितीही संघटनेकडून देण्यात आली आहे. जागतिक स्तरावर डाळींच्या वाढत्या किंमती आणि खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतीमुळे खाद्यान्नाचे दर वाढले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. खाद्यतेलाच्या किंमती ऑक्टोबरमध्ये 10 टक्केपर्यंत वाढल्या असल्याने महागाईत वाढ झाली आहे. अनियमीत पुरवठा, जास्त भाव, कारखाने बंद आणि राजकीय तणावाच्या परिणामामुळे खाद्यान्नाचे दर वाढलेले असल्याचेही संघटनेने नमूद केले आहे. गव्हाच्या किंमतीचा वाटा खाद्यान्नाच्या दरात वाढ होण्यात मोठा राहिला आहे. गव्हाच्या किंमती 12 महिन्यात 40 टक्के इतक्या वाढल्या आहेत. कॅनडा, रशिया आणि अमेरिकेत गव्हाचे उत्पादन यंदा कमी झाले आहे.