इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर तेजीत : निफ्टी 13,601.10 वर स्थिरावला
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय शेअर बाजारात चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक संकेतामुळे सेन्सेक्स मजबूतीसह बंद झाला आहे. यामध्ये दिवसभरातील व्यवहारानंतर इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससारख्या मोठय़ा कंपन्यांचे समभाग तेजीत राहिल्याने सेन्सेक्सने 437 अंकांच्या वाढीचा यशस्वी टप्पा गाठल्याचे पहावयास मिळाले आहे.
बीएसईमधील प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीने सेन्सेक्स दिवसअखेर 437.49 अंकांनी वधारुन 46,444.18 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 134.80 अंकांनी वाढून निर्देशांक 13,601.10 वर स्थिरावला आहे.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये बुधवारी हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग सर्वाधिक म्हणजे तीन टक्क्यांनी वधारले आहेत. सोबत इन्फोसिस, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, आयटीसी, एसबीआय, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, एशियन पेंटस तसेच भारती एअरटेलचे समभाग नफा कमाईत राहिले होते. दुसऱया बाजूला टायटन, पॉवरग्रिड आणि एनटीपीसीचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.
जागतिक शेअर बाजारातील वातावरणामुळे भारतीय बाजार स्थिरावला होता. सरकारी बँक आणि औwषध कंपन्यांच्या समभागांच्या जोरावर बाजाराने मजबुत स्थिती प्राप्त केली होती. या कारणामुळे शेअर बाजार नुकसानीतून सावरला असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर आशियातील शांघाय, सियोल, हाँगकाँग आणि टोकीयो लाभासह बंद झाले आहेत. युरोपीयन बाजारातही तेजीचा कल राहिला होता.
कोरोना नव्या रुपाचा प्रभाव
कोरोनाचा आता नवीन अवतार ब्रिटनमध्ये आढळून आल्याने विविध देशातील अर्थव्यवस्थेवर अंकुश लावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही सध्या तरी सुस्थितीत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.