सेन्सेक्स-निफ्टी जवळपास 3 टक्क्यांनी वधारले
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारातील मजबूत संकेतामुळे तेजीला समर्थन मिळाले आहे. यामुळे भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी सेन्सेक्स व निफ्टी यांच्या निर्देशांकांने मजबूत झेप घेतल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 1,534.16 अंकांनी म्हणजे 2.91 टक्क्यांनी वधारत 54,326.39 बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 456.75 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 16,266.15 वर बंद झाला आहे. काहीकाळ सेन्सेक्स 1,604.2 वर उच्चांकी पातळीवर कार्यरत राहिला होता.
सेन्सेक्समध्ये सर्व कंपन्यांचे समभाग मजबूत स्थितीत राहिल्याचे दिसून आले. यामध्ये प्रामुख्याने डॉ. रेड्डीज लॅब, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, नेस्ले, लार्सन ऍण्ड टुब्रो, ऍक्सिस बँक, सन फार्मा, भारतीय स्टेट बँक आणि एचडीएफसी यांचे समभाग फायद्यात राहिले आहेत.
जागतिक पातळीवर आशियातील अन्य बाजारात चीनचा शांघाय, हाँगकाँगचा हँगसेंग, दक्षिण कोरियाचा कॉस्पी आणि जपानचा निक्की वाढीसह बंद झाला आहे. युरोपीय बाजार दुपारपर्यंतच्या सत्रात लाभामध्ये बाजार होता.
घसरण-तेजीतील आकडेवारीचा हा योगायोग?
साधारणपणे हा योगायोग म्हणावा लागेल कारण चालू आठवडय़ातील गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्स तब्बल 1,416.30 अंकांनी म्हणजे 2.61 टक्क्यांनी प्रभावीत होत 52,792.23 वर बंद झाला आहे. दुसरीकडे निफ्टी 430.90 अंकांनी घसरण झाली. अशीच काहीशी स्थिती मात्र सकारात्मकता दुसऱया दिवशी शुक्रवारी भारतीय बाजारात निर्माण झाली होती. यामध्ये सेन्सेक्स 1534 तर निफ्टी 456पेक्षा अधिक अंकांनी वधारत बंद झाला आहे. याचदरम्यान आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड 0.11 टक्क्यांनी घसरुन 111.9 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे. शेअर बाजारातील मिळत्या जुळत्या आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी देशातील बाजारातून विक्री सुरु असल्याने यामध्ये 4,899.92 कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री झाली आहे. .