वृत्त संस्था/ बेलग्रेड
भारताचा मुष्टियोद्धा शिवा थापाने येथे सुरू असलेल्या एआयबीएच्या विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेतील आपल्या वजनगटात उपांत्यपूर्व फेरी गाठताना फ्रान्सच्या हेमरोहीचा पराभव केला.
आतापर्यंत पाचवेळा आशियाई स्पर्धा पदक मिळविणाऱया आसामच्या 27 वर्षीय शिवा थापाने सोमवारी रात्री उशिरा झालेल्या उपउपांत्यपूर्व लढतीत फ्रान्सच्या लोनेस हेमरोहीचा 4-1 अशा गुणांनी पराभव करत शेवटच्या आठ स्पर्धकांमध्ये स्थान मिळविले. 2015 साली झालेल्या या स्पर्धेत शिवा थापाने कांस्य मिळविले होते.
या स्पर्धेत आता दोन पदके मिळविणारा शिवा थापा हा भारताचा पहिला पुरूष मुष्टियोद्धा ठरणार आहे. सोमवारी झालेल्या विविध वजन गटातील लढतीत भारताच्या चार स्पर्धकांचे आव्हान संपुष्टात आले. 51 किलो वजनगटात दीपक बोहरियाचा यामध्ये समावेश आहे. 54 किलो वजनगटात भारताचा आकाशकुमार, 92 किलोवरील गटात नरेंद्र बेरवाल, 71 किलो वजनगटात निशांत देव आणि 92 किलो वजनगटात संजित यांच्या लढती मंगळवारी होत आहेत. या स्पर्धेत 100 देशांचे सुमारे 600 स्पर्धक सहभागी झाले असून सुवर्णपदक विजेत्याला एक लाख डॉलर्स, रौप्यपदक विजेत्याला 50 हजार डॉलर्स आणि दोन्ही कास्यपदक विजेत्यांना प्रत्येकी 25 हजार डॉलर्सचे बक्षीस मिळणार आहे.