फोंडा तालुक्यात योगसत्रांना लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी / फोंडा
कोरोना महामारीच्या संक्रमणामुळे सामुहिक एकत्रिकणावर मर्यादा आल्याने रविवारी जागतिक योगदिन ऑनलाईन माध्यमातून जुळून आला. फोंडा तालुक्यातील विविध शिक्षण व योगप्रसार संस्थानी ऑनलाईन योगसत्रे घेतली. फर्मागुडी येथील पीईएस उच्च माध्यमिक विद्यालय, पतंजली योग समिती फोंडा, ओम नित्य दिव्य योगाश्रम बेतोडा, पद्मनाभ शिष्य संप्रदाय, तपोभूमी यांच्यासह अन्य काही शैक्षणिक व अध्यात्मिक संस्थानी गुगल, फेसबुक किंवा इतर ऑनलाईन माध्यमांतून योगदिन साजरा केला.
फर्मागुडी येथील पीईएस उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे आयोजित केलेल्या ऑनलाईन योगसत्राशी शंभरहून अधिक विद्यार्थी, शिक्षक व पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी जोडले गेले होते. संस्थेचे सचिव रितेश रवी नाईक यांनीही या सत्रात सहभाग दर्शविला. विद्यालयाचे शारीरिक शिक्षक बी. आर. पाटील यांनी कॉलेज जिमखानातून सर्वांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. तासभर चाललेल्या या सत्रात योगासने, प्राणायम, ध्यान आदी योगाचे विविध प्रकार करुन घेण्यात आले. योगावर ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धाही घेण्यात आल्याची माहिती बी. आर. पाटील यांनी दिली.
पतंजली योग केंद्रातर्फे फोंडा तालुक्यातील विविध भागात संस्थेशी जोडल्या गेलेल्या अनेकांना व्हीडीओ रेकॉर्डिंग व ऑनलाईन लिंक पाठवून योगसत्रे घेण्यात आली. लोकांना घरातून या सत्रांद्वारे योगासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. पतंजलीच्या योग शिक्षकांनी या ऑनलाईन सत्रात मार्गदर्शन केले. पतंजलीचे योगशिक्षक व पदाधिकाऱयांचे पाटणतळी-बांदोडा येथेही थेट योगसत्र झाले. सामाजिक अंतर व अन्य नियमांचे पालन करुन हे प्रत्यक्ष योगसत्र घेण्यात आले. माजी आमादार तथा पतंजली संस्थेचे पदाधिकारी मोहन आमशेकर यांनी यावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक असल्याचे सांगून योग प्राणायम हा त्यावर उत्तम उपाय असल्याचे नमूद केले.
कसमशेळ बेतोडा येथील ओम नित्य निव्य योगाश्रमतर्फे वास्को येथील दीपक विहार शिक्षण संस्थेचे विद्यार्थी व शिक्षकांसाठी ऑनलाईन योगसत्र घेण्यात आले. शंभरच्या आसपास विद्यार्थी या सत्राशी ऑनलाईन जोडले गेले होते. याशिवाय योगाश्रमाशी निगडीत काही मोजक्याच लोकांसाठी योग मार्गदर्शक जयवंत नाईक यांनी योगसत्र घेतले. सामाजिक अंतर राखून हे सत्र आयोजित करण्यात आले होते.
तपोभूमीवरुन ऑनलाईन ‘हर घर योग’
योग व अध्यात्माचा प्रचार व प्रसार करणाऱया कुंडई येथील तपोभूमी गुरुपिठातर्फे गोव्यासह, महाराष्ट्र व कर्नाटकातील अनुयायींसाठी रविवारी सायंकाळी ऑनलाईन योगसत्र घेण्यात आले. याशिवाय दुबई, ओमान, इटली व अमेरिकेतील अनुयायी या कार्यक्रमाशी ऑनलाईन जोडले गेले होते. तपोभूमिचे पिठाधीश प. पू. ब्रह्मेशानंद स्वामीजींनी तपोभूमीवरुन ऑनलाईन माध्यमातून असंख्य भक्तगण व अनुयायींना मार्गदर्शन केले. सकाळी सुर्यग्रहण असल्याने सायंकाळच्या वेळी हे योगसत्र आयोजित करण्यात आले होते. भक्तगणांना फेसबुकच्या माध्यमातून लिंक देत आपल्या घरातूनच या योगसत्रात सहभागी होता आले. सद्गुरु योग गुरुकुलतर्फे ‘हर घर योग’ या संकल्पनेतून हे ऑनलाईन योगसत्र घडवून आणले होते.
विविध संस्थाबरोबरच राजकीय पुढारी, आजी माजी आमदार, खासदारांनीही आपल्या घरातूनच आंतरराष्ट्रीय योगदिनात सहभाग दर्शविला. दक्षिण गोव्याचे माजी खासदार तथा एनआरआय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर यांनी खडपाबांध-फोंडा येथील आपल्या घरीच योगासने व प्राणायम केले. समाज माध्यमातून त्यांनी योगदिनाच्या शुभेच्छाही पाठविल्या. आपण नियमित योगा करीत असून आजचा दिवस खास होता. सकाळी योगा केल्याने सततच्या धावपळीमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलीत राखण्यासाठी त्याचा फायदा होत असल्याचे, त्यांनी सांगितले.