सेन्सेक्स 769 अंकांनी प्रभावीत : रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱया सत्रात शुक्रवारी घसरणीचे वातावरण राहिले होते. जागतिक पातळीवर रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे जागतिक शेअरबाजारांमध्ये नकारात्मक स्थिती राहिली होती. यासोबत बीएसई सेन्सेक्स 769 अंकांनी नुकसानीसह बंद झाला आहे.
शुक्रवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्सची सुरुवात नकारात्मक झाली. तसेच दिवसअखेर 768.87 अंकांनी घसरुन निर्देशांक 54,333.81 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 252.70 अंकांच्या नुकसानीसह 16,245.35 वर बंद झाला आहे.
जागतिक घडामोडींचा प्रभाव
मागील आठ दिवसांपासून जागतिक पातळीवर युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरु आहे. याचा फटका हा विविध उद्योग व्यवसायांसोबत आयात-निर्यातीसह आर्थिक उलाढालींना बसत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये शुक्रवारी युक्रेन येथे असणाऱया सर्वात मोठय़ा अणूऊर्जा प्रकल्पावर रशियाने हल्ला केल्याची माहिती आहे. या घटनेमुळे तणावपूर्ण स्थिती जागतिक पटलावर निर्माण झाली असून या चिंताजनक स्थितीमुळे भारतीय भांडवली बाजारात शुक्रवारचे सत्र मोठय़ा नुकसानीसह बंद झाले आहे. यावर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून चिंता व्यक्त केली आहे.
प्रमुख समभागात आयटी आणि औषध कंपन्यांच्या समभागांच्या लिलावात घसरण राहिली. तसेच सेन्सेक्समध्ये टायटन, मारुती सुझुकी, एशियन पेन्ट्स. महिंद्रा ऍण्ड महिंद्रा तसेच हिंदुस्थान युनिलिव्हरच्या समभागात 5.05 टक्क्यांची घसरण राहिली आहे. अन्य कंपन्यांमध्ये आयटीसी, डॉ.रेड्डीज लॅब, टेक महिंद्रा आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग तेजीसह बंद झाले.
जागतिक शेअर बाजारात आशियातील अन्य बाजारांपैकी हाँगकाँगचा हँगसेंग, चीनचा शांघाय कम्पोजिट निर्देशांक आणि जपानचा निक्की हे नुकसानीत राहिले होते.
अमेरिकन शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. याचदरम्यान आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूड0.80 टक्क्यांनी वधारुन 111.3 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे.