आर्थिक कंपन्यांची नफा कमाई : निफ्टीत 166.55 अंकांची घट
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील तेजीचा प्रवास गुरूवारी थांबला आहे. जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरण आणि आर्थिक कंपन्यांच्या समभागातील नफा कमाईच्या सिलसिल्यामुळे सेन्सेक्स गुरुवारी तब्बल 580.09 अंकांनी कोसळला आहे. प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीमुळे सेन्सेक्समध्ये चढउताराचे वातावरण राहिले होते.
निवडक क्षेत्रात झालेल्या नफा कमाईच्या जोरावर गुरुवारी दिवसअखेर सेन्सेक्स 580.09 अंकांनी घसरुन 43,599.96 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 166.55 अंकांनी प्रभावीत होत 12,771.70 वर स्थिरावला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये स्टेट बँकेचे समभाग सर्वाधिक पाच टक्क्यांनी घसरले आहेत. सोबत ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक आणि भारती एअरटेल यांचे समभाग मात्र नुकसानीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये गुरुवारी पॉवरग्रिड, आयटीसी, एनटीपीसी, टाटा स्टील आणि टायटन यांचे समभाग तेजीत राहिले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यूयॉर्कमध्ये सार्वजनिक शाळा बंद केल्या आहेत. यासोबतच आर्थिक अंकुश लावण्याचे संकेत आहेत. याचेही पडसाद देशातील शेअर बाजारावर पडले आहेत. सर्व बाजारांमध्ये नफा कमाईचा सूर असल्याने आशियातील बाजारांमध्ये हाँगकाँगचा हँगसेंग आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी नुकसानीत राहिले आहेत. चीनचा शांघाय कम्पोजिट तसेच जपानचा निक्की लाभात राहिला आहे. जागतिक बेंचमार्क बेंट कच्चे तेल 0.65 टक्क्यांनी नुकसानीसोबत 44.05 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.
दुसऱया लाटेची भीती
जगात सध्या कोविड19 च्या दुसऱया लाटेची भीती पसरली आहे. यामध्येच कोणती कोविड लस प्रभावीपणे काम करेल यासंदर्भात कोणीच ठोस मांडलेले नाही. यामुळे जगातील काही निवडक देश पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्याचा पर्याय स्विकारत आहेत. सदर घडामोडींचा परिणाम देशासह भांडवली बाजारांवर होत आहे.