स्ट्रटेजी ऍनालिटिक्सच्या अहवालामधून माहिती; ऍपल दुसऱया तर शाओमी तिसऱया स्थानी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्मार्टफोन निर्मितीमधील दिग्गज कंपनी सॅमसंग पुन्हा मार्च तिमाहीत जागतिक स्मार्टफोनच्या विक्रीत अव्वल स्थानी राहिली असल्याची माहिती आहे. यामध्ये दुसऱया स्थानावर दिग्गज अमेरिकन स्मार्टफोन कंपनी ऍपल असून तिसऱया नंबरवर चीनची कंपनी शाओमी राहिली असल्याचे सांगितले आहे. मार्च तिमाहीमध्ये शाओमीची विक्री भारत आणि चीन या देशांमध्ये मजबूत स्थितीत राहिल्याची नोंद केली असल्याची माहिती स्ट्रटेजी ऍनालिटिक्सने आपल्या अहवालामध्ये दिली आहे.
स्ट्रटेजी ऍनालिटिक्सच्या प्राप्त अहवालानुसार दक्षिण कोरियातील दिग्गज इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने मार्च तिमाहीत 7.7 कोटी स्मार्टफोन्स विकले आहेत. यामध्ये ग्लोबल स्मार्टफोन बाजारात सॅमसंगची हिस्सेदारी ही 23 टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती आहे. शेअर बाजारातील समभाग हा वर्षाच्या आधारे 32 टक्क्यांनी वाढल्याची नोंदणी आहे.
दुसऱया बाजूला ऍपल कंपनी किरकोळ विक्रीत दुसऱया स्थानी राहिली असून जानेवारी ते मार्चदरम्यान 5.7 कोटी आयफोन्सची विक्री करण्यात आली आहे. चीनची शाओमी कंपनी सलग दुसऱया तिमाहीतही तिसऱया स्थानी कायम राहिली असून जगभरात जवळपास 4.9 कोटी स्मार्टफोन्सची विक्री करण्यात आल्याची नोंद केली आहे.
जुन्या स्मार्टफोनला नापसंती
मार्च तिमाही दरम्यान जागतिक पातळीवर स्मार्टफोनची विक्री ही 34 कोटी झाली आहे. या अगोदरच्या वर्षात स्मार्टफोन विक्रीपेक्षा ही 24 टक्क्यांनी अधिक विक्री
झाल्याची माहिती आहे. 2015 नंतर प्रथमच स्मार्टफोनची जागतिक विक्री इतक्या प्रमाणात झाल्याचे सांगितले आहे.
5 स्मार्टफोन कंपन्यांचा 76 टक्के बाजाराचा हिस्सा
जगातील प्रमुख स्मार्टफोन्सचा हिस्सा हा पहिल्या पाच कंपन्यांच्या हाती असून यांचा जवळपास 76 टक्के इतका वाटा जागतिक स्मार्टफोन बाजारात असल्याची माहिती स्ट्रटेजीच्या अहवालामधून देण्यात आली आहे.