मैत्रिणींनो, तुम्ही वरचेवर फेशियल करत असाल. त्वचेवा तजेला टिकवून ठेवायचा तर नियमित फेशियल करायलाच हवं. पार्लरमध्ये गेल्यावर वेगवेगळ्या फेशियल्सची माहिती दिली जाते. आपण आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आणि गरजेनुसार कोणतं फेशियल करायचं हे ठरवायला हवं. फेशियलचे अनेक प्रकार उपलब्ध असले तरी त्वचेसाठी कुठलं फेशियल योग्य आहे हे माहित असणं गरजेचं आहे. स्टीम फेशियल हा अत्यंत साधा आणि सोपा प्रकार आहे. तुम्ही घरीच स्टीम फेशियल करू शकता. कसं करायचं हे फेशियल? पाहू या
- आधी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. थंड पाण्याने चेहरा धुतल्याने चेहर्याची रोम छिद्रं उघडतात आणि त्यात अडकलेली घाण, धूळ निघून जाते. धुवून झाल्यावर चेहरा हलक्या हातानं टिपून घ्या.
- वाफ घेण्यासाठी पाणी गरम करायला ठेवा. त्वचेला सहन होईल इतकंच पाणी गरम करा. त्यामध्ये इसेंशियल ऑईल मिसळा. बाजारात इसेंशियल ऑईलचे वेगवेगळे प्रकार मिळतात. त्वचेच्या गरजेनुसार तुम्ही योग्य प्रकारच्या ऑईलची निवड करु शकता.
- वाफ घेत असताना अधून मधून दीर्घ श्वास घ्या. असं केल्यामुळे वाफ त्वचेच्या आतल्या छिद्रांपर्यत पोहोचेल. खुप वेळ वाफ घेतल्यास त्वचा कोरडी होण्याचा धोका संभवतो.
- यानंतर त्वचेला फेसमास्क लावा. यासाठी मुलतानी मातीचा फेस पॅक वापरणं सर्वोत्तम पर्याय आहे. या पॅकमुळे त्वचेचं टॅनिंग दूर व्हायला मदत होते.
- पॅक काढल्यानंतर टोनरचा वापर करा. टोनरच्या वापराने त्वचेची छिद्रं बंद होतात. टोनर म्हणून लिंबाच्या रसाचाही वापर करता येऊ शकतो.
- वाफ घेतल्याने त्वचा कोरडी पडल्यास त्वचेला मॉईश्चरायजर लावा. यामुळे त्वचेचं संतुलन टिकून राहतं आणि त्वचा नितळ तसंच तेजस्वी दिसू लागते.