माता मंजम्मा जोगती यांनी उलगडला जीवनप्रवास : केएलई स्वशक्ती महिला सक्षमीकरण मंचतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
तृतीयपंथी असल्याने समाजाने माझा जगण्याचा हक्कच नाकारला. मात्र याच समाजाशी दोन हात करत मी उभी राहिले. जोगतीण म्हणून वावरताना जानपद कलेचे अस्तित्व अबाधित राहण्यासाठी माझा संघर्ष सुरू झाला. मला पद्मश्री मिळाली. ज्या आईने मला नाकारले त्याच आईला मी पद्मश्री समर्पित केली. कारण जेव्हा जेव्हा कोणतीही आई देवासमोर उभी राहते ती पतीसाठी किंवा स्वतःसाठी काही मागण्याआधी माझ्या मुलांचे कल्याण कर, अशी प्रार्थना करते. म्हणूनच आई अर्थात महिला श्रे÷ आहे, असे विचार माता मंजम्मा जोगती यांनी व्यक्त केले.
केएलई स्वशक्ती महिला सक्षमीकरण मंचतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त माता मंजम्मा यांना प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. जेएनएमसीच्या जिरगे सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, मंचच्या अध्यक्षा आशा कोरे आदी उपस्थित होते.
माता मंजम्मा यांनी आपला जीवनप्रवास उलगडला तेव्हा सभागृहातील प्रत्येकजण अंतर्मुख झाला होता. आम्ही 21 भावंडे. त्यापैकी 17 दगावली. बालपणापासून मला नटणे, मुरडणे, दागिने घालणे, मुलींचे कपडे घालणे आवडायचे. शाळेतही मी मुलींचेच पात्र वठवत असे. परंतु एका नाटकात मुलीची भूमिका केल्यामुळे वडिलांनी जबर मारहाण केली होती. एसएसएलसीनंतर माझे वेगळेपण पाहून मला भावाकडे पाठविले गेले. तेथे मी महिला करतात ती सर्व कामे करू लागले. परंतु भावाने मानहानी करतीस म्हणून मारून पुन्हा पाठविले.
माझे एक मामा किन्नर होते. त्यांनी माझी अवस्था ओळखून मला घरी नेले. तेथे स्त्राrवेष घालून मी काम करू लागले. परंतु न सांगता चित्रपटाला गेल्यामुळे मामांनी काठी मोडेपर्यंत मला मारले व परत आईकडे सोडले. आपले मूल वेगळे आहे हे लक्षात येताच मला दवाखान्याला नेण्यात आले. परंतु वास्तव स्वीकारा, असे पालकांना सांगण्यात आले. त्यामुळे होस्पेट येथील हुलगी गावात पाच जोगत्यांच्या उपस्थितीत माझा करदोळा काढून मला जोगतीण करण्यात आले. हे सर्व पाहून आईची शुद्ध हरपली. मी पुजाऱयाकडे गेलो तेथेही त्रास सुरू झाला. म्हणून विष घेण्याचा प्रयत्न केला. दवाखान्यात ऍडमीट असल्याने तेथे वॉर्डमध्ये नाचगाणी करत होतो. पुन्हा घरी परतलो तेंव्हा वडिलांनी मला घरी घेण्याचे नाकारले. हॉस्पिटलमध्ये ओळख झालेल्या राधम्मा यांच्याकडे मी गेले. त्यांनी मला परिचितांच्या घरी खोली देऊन माझी सोय केली. मात्र एक दिवस रात्री परतताना 5 दारुडय़ांनी माझी विटंबना केली. तेव्हा मी पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे मंजम्मा यांनी नमूद केले.
पद्मश्री आईला समर्पित
दावणगेरी स्टॅण्डवर बाप-लेक नृत्य करून पैसे कमवत. मी त्यांच्या सोबत गेले. एक वर्ष राहूनही त्यांनी मला पैसे दिले नाहीत. म्हणून हुलेगामीला आले. भजनी मंडळासमवेत राहून नाचगाणी शिकले. इडली-चटणी विकू लागले. याच दरम्यान कन्नड व सांस्कृतिक खात्यातर्फे मला सर्वत्र नृत्य करण्याची संधी मिळाली. चोरनूर कोट्रप्पा यांनी मला माता मंजम्मा असे नाव दिले. नाटकात माझे काम आवडू लागले आणि जानपद गीतांचा माझा अभ्यास लक्षात घेऊन माझा प्रवास समजल्यानंतर सरकारने मला पद्मश्री दिली. मात्र आईने जन्म दिला म्हणून माझे अस्तित्व आहे या भावनेतून आपण पद्मश्री आईला समर्पित केली, असे त्या म्हणाल्या. प्रारंभी केएलई स्कूल ऑफ म्युझीकच्या शिक्षिकांनी स्वागतगीत सादर केले. मंचच्या सचिव डॉ. नेहा धडेद यांनी स्वागत केले. आशा कोरे यांच्या हस्ते मंजम्मा यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. प्रभाकर कोरे यांनी तृतीयपंथीसुद्धा माणूस आहे, हा संदेश माता मंजम्मा यांच्यामुळे समाजात पोहोचला. त्यामुळे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे, असे सांगितले. सूत्रसंचालन ज्योती कावळेकर व स्नेहल धर्मायक यांनी केले.
समाजात वेगळेपण दिसल्यास धिक्कार करू नका
मी जे भोगले ते माझ्या साथीदारांनी भोगू नये यासाठी आज दोन मुलांचा सांभाळ मी करत आहे. एक वृद्ध आजी माझ्या सोबत आहे. 15 ते 20 जणींना नृत्य शिकवते आहे. माझे आत्मचरित्र गाजले आणि विद्यापीठात अभ्यासक्रमाला लागले. जानपद कला चिरंतन रहावी यासाठी माझे काम सुरू आहे. परंतु समाजात वेगळेपण दिसताच त्याचा धिक्कार करू नका, जगण्याचा हक्क त्यांनासुद्धा आहे हे लक्षात घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.