सलग तिसऱया महिन्यात टप्पा केला पार
नवी दिल्ली
आर्थिक मंदीच्या दरम्यान अर्थसंकल्प सादरीकरणाच्या एक दिवस अगोदर वस्तू आणि सेवा करामुळे (जीएसटी) अर्थव्यवस्थेला चांगली बातमी मिळाली. जानेवारीत जीएसटी संकलनाने 1.1 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. हा सलग तिसरा महिना आहे, जो जीएसटी संकलनाने एक लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे, अशी माहिती सूत्रांकडून रविवारी देण्यात आली.
सचिव अजय भूषण पांडे यांनी निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने हा महसूल आहे. दरम्यान, त्यांनी कर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांसोबत काही उच्चस्तरीय बैठकी घेतल्या होत्या. त्यांनतर हे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. जानेवारीमध्ये जीएसटीचे स्थानिक संकलन सुमारे 86,453 कोटी रुपये आहे. तर एकत्रित जीएसटी (आयजीएसटी) आणि उपकरातून 23,597 कोटी रुपये जमा झाले आहेत. हे आकडे तात्पुरते असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
सरकारने जीएसटी संकलन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नवीन कल्पना देण्यासह जीएसटी प्रणालीला अधिक बळकटी देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी सहभागी आहेत. याव्यतिरिक्त सरकार करचोरीच्या विरोधात मोहीम चालवत आहे.
एप्रिलपासून सरल जीएसटी रिटर्न पद्धत
जीएसटी रिटर्न सादर करण्याची पद्धत अधिक किचकट असल्याच्या तक्रारी वाढल्यामुळे येत्या एप्रिल महिन्यापासून सरल जीएसटी रिटर्न पद्धत लागू करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे. जीएसटीमुळे ग्राहकांना संपूर्ण वर्षात एक लाख कोटी रुपयांचा लाभ झाला असल्याचेही त्या म्हणाल्या.