पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते उद्घाटन : पणजीसह राज्यभरात होणार कार्यक्रम
प्रतिनिधी /म्हापसा
येत्या 6, ते 8 जानेवारीपर्यंत राज्यात दिव्यांग मुलांसाठी पणजी येथे पर्पल महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे, अशी माहिती समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी म्हापसा येथे बोलताना केली.
खोर्ली – म्हापसा येथील आनंद निकेतन आस्थातर्फे दिव्यांग मुलांसाठी बालदिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्र्यांनी वरील माहिती दिली. व्यासपीठावर गोवा राज्य दिव्यांग आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, आस्थाचे चेअरमन सिद्धेश कोटकर, गीता विश्वकर्मा, सुधीर रिवणकर उपस्थित होते.
राज्याच्या इतिहासात अशा प्रकारचा महोत्सव पणजीत प्रथमच होणार आहे. याद्वारे सर्वांना वेगळा अनुभव मिळणार आहे. देशभरातील दिव्यांग मुले या महोत्सवात भाग घेणार आहेत. विविध स्पर्धा, कार्यक्रमांचे आयोजन होईल. डिचोली, म्हापसा, सांखळी, पेडणे, काणकोण, पणजी समुद्रकिनारा या ठिकाणीही विविध कार्यक्रम आयोजित करणार आहेत. देशभरातील अती महनीय व्यक्ती, कलाकार यात सहभागी होणार आहेत. सर्व दिव्यांग व्यक्ती एका व्यासपीठावर उपस्थित राहणार असून देशात दिव्यांगाबाबत अद्याप धोरण अवलंबिले गेले नाही त्याबाबतही येथे या महोत्सवाद्वारे चर्चा करण्यात येणार आहे. जेणेकरून या धोरणाद्वारे दिव्यांगासाठी त्याचा फायदा होणार आहे, असेही मंत्री म्हणाले.
दिव्यांग मुलांसाठी आम्ही एकत्रितपणे झटुया व विविध योजना त्यांना या ‘पर्पल महोत्सवा’द्वारे देऊया. असा महोत्सव राज्यात कायमस्वरुपी ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करुया. केंद्रीय समाजकल्याणमंत्री ब्रेन कुमार हे उद्घाटन सोहळय़ास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
एक आमदार असलेल्या पक्षाने सल्ले देऊ नये
राज्य सरकार व्यवस्थित चालले आहे. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पातळीवरील सर्वांत मोठा पक्ष आहे. विजय सरदेसाई सारख्या माणसाने आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही. कोणाला मुख्यमंत्री करावा, कुठला बरा, कुठला वाईट हे सल्ले त्यांनी देऊ नये. एकच आमदार असलेल्या पक्षाच्या आमदाराने आम्हाला सल्ला देणे बरे वाटत नाही, अशी टीका समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना केली.