गोवा ट्रव्हल्स ऍण्ड टुरिझम असोसिएशनची मागणी
प्रतिनिधी/ पणजी
जानेवारी 2021 पासून गोव्यात चार्टर विमाने सुरु करावीत आणि त्याची घोषणा राज्य सरकारने आता करावी अशी मागणी टॅव्हल्स आणि टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाने (टीटीएमजी) केली आहे. तशी घोषणा झाली तर हॉटेल आरक्षण सुरु करणे शक्य होईल, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. दरम्यान, सध्या देशी पर्यटक हळूहळू गोव्यात येण्यास सुरुवात झाली असून त्यांच्यावरच गोव्यातील हॉटेलवाले दिवस ढकळत आहेत. परदेशी पर्यटक घेऊन येणारी चार्टर विमाने अद्याप सुरु झालेली नसल्याने त्यांना येण्यास अडचण होत आहे. ती दूर करावी आणि त्या विमानांना हिरवा कंदील दाखवावा, असे असोसिएशनने सूचवले आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष नितीन शहा यांनी सांगितले की, कोरोनामुळे गोव्यातील पर्यटनावर मोठा परिणाम झाला असून त्यावर अवलंबून असणारे उद्योग मंदीत सापडले आहेत. पर्यटनाला उभारी मिळण्यासाठी चार्टर विमाने सुरु करणे आवश्यक असून जानेवारीपासून ती विमाने चालू झाली तर नवीन वर्षात तरी पर्यटन वाढेल. त्या विमानांची घोषणा आताच करणे योग्य आहे. जेणेकरुन परदेशी पर्यटकांना नियोजन करणे आणि गोव्यात त्यांच्यासाठी आरक्षण करणे शक्य होईल. सध्या तरी आरक्षण घेता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.