वृत्तसंस्था / कोलंबो
2021 लंका प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील झालेल्या सामन्यात कर्णधार थिसारा परेराच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर जाफना किंग्जने कोलंबो स्टार्सचा 93 धावांनी पराभव केला. या स्पर्धेतील हा नववा सामना होता.
या सामन्यावेळी पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी प्रत्येकी 2 षटकांची कपात केली. प्रथम फलंदाजी करताना जाफना किंग्जने 18 षटकात 6 बाद 207 धावा जमविल्या. थिसारा परेराने 23 चेंडूत 5 षटकार, तीन चौकारांसह 57 धावा झळकविल्या. शोएब मलिकने 24 चेंडूत 2 षटकार। 4 चौकारांसह 44 धावा केल्या. शोएब मलिकने केडमोरसमवेत 60 धावांची भागीदारी केली. केडमोरने 21 चेंडूत 40 धावा जमविल्या. मलिकने बंदारासमवेत 44 धावांची भर घोतली. बंदाराने 30 चेंडूत 42 धावा झळकविल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना कोलंबो स्टार्सचा डाव 15.5 षटकात 114 धावांत आटोपला. जाफना किंग्जतर्फे महेश तिक्षणाने 25 धावांत 4 तर वहाब रियाझने 26 धावांत 4 गडी बाद केले. जाफना किंग्जने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 6 गुणांसह पहिले स्थान मिळविले आहे.
संक्षिप्त धावफलक
जाफना किंग्ज 18 षटकात 6 बाद 207 (थिसारा परेरा 57, शोएब मलिक 44, केडमोर 40, बंदारा 42), कोलंबो स्टार्स 15.5 षटकात सर्वबाद 114 (महेश तिक्षणा 4-25, वहाब रियाज 4-26).