आंतरराज्य गुन्हेगाराच्या मनपरिवर्तनाची गरज : वाढत्या घरफोडय़ांच्या पार्श्वभूमीवर ‘तरुण भारत’ने केले होते सावध
प्रतिनिधी /बेळगाव
भरदिवसा घरफोडय़ा करणाऱया आंतरराज्य गुन्हेगारांना बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे. मूळचा बेळगावचा व शेजारच्या गोव्यात राहून बेळगावसह उत्तर कर्नाटकातील वेगवेगळय़ा जिल्हय़ातील पोलीस यंत्रणेला आव्हान ठरलेल्या प्रकाश विनायक पाटील (वय 37) व त्याचा साथीदार महेश रामा काळगिनकोप्प (वय 37) रा. खानापूर या जोडगोळीने केलेल्या 22 घरफोडय़ांचा तपास लागला आहे.
दोन वर्षांपूर्वी प्रकाश पाटीलला अटक झाली होती. तो मूळचा बेळगावचा. सध्या झरीवाडा, साखळी-गोवा येथे त्याचे वास्तव्य आहे. दिवसा घरफोडय़ा करण्यात तो पटाईत आहे. कार घेऊन गोव्यातून सुटला की सोने, चांदी, रोकड घेऊनच पुन्हा गोव्यात परततो. नेहमी त्याने आपल्यासोबत एक साथीदार ठेवलेला असतो. अधूनमधून तो साथीदार बदलतो.
6 डिसेंबर 2020 रोजी झाडशहापूरजवळ बेळगाव ग्रामीण पोलीस व स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून प्रकाशला अटक केली होती. त्यावेळी त्याच्यासोबत निथाई मंडल (वय 41) रा. पश्चिम बंगाल हा साथीदार होता. फिल्मी स्टाईलने पाठलाग करून चन्नप्पा हुनचाळ व योगेश तळेवाड या दोन पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याला अटक केली होती. बेळगाव ग्रामीणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी 51 लाख 60 हजार किमतीचे 848 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, एक कार जप्त केली होती.
प्रकाश पाटील हा महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा पोलिसांना सतत गुंगारा देत असतो. एखाद्या गुन्हय़ात जामिनावर बाहेर पडल्यानंतर तो पुन्हा घरफोडय़ा करतो. जामिनावर मुक्तता झाल्यानंतर प्रकाश अधूनमधून बेळगावात दिसायचा. सीसीटीव्ही फुटेजमध्येही त्याची छबी अनेकवेळा कैद झाली होती. उपनगरात झालेल्या अनेक घरफोडय़ा प्रकरणात प्रकाशची छबी कैद झाली होती. मात्र, तो पोलिसांना सापडत नव्हता.
गेल्या आठवडय़ात गुन्हे तपास विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा आदी वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील, कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी प्रकाश व त्याचा नवा साथीदार महेश काळगिनकोप्प यांना अटक केली. महेश हा मूळचा खानापूरचा असला तरी सध्या सिंधुदुर्ग जिल्हय़ातील वैभववाडी येथे त्याचे वास्तव्य होते.
जोडगोळीमुळे 22 गुन्हय़ांचा उलगडा
या जोडगोळीमुळे बेळगाव परिसरातील 13 घरफोडय़ांचा तपास लागला आहे. बेळगाव व धारवाड जिल्हय़ात प्रकाश व त्याच्या साथीदारांनी केलेल्या 22 गुन्हय़ांचा उलगडा झाला आहे. दीड किलो सोने, चार किलो चांदी, मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. यापूर्वीही प्रकाशला अनेकवेळा बेळगावात अटक झाली आहे. सुटका झाल्यानंतर पुन्हा तो आपल्या कामाला लागतो, असा त्याचा इतिहास आहे.
चोऱया, घरफोडय़ा, चेनस्नॅचिंग, वाटमारी, दरोडे आदी गुन्हे घडल्यानंतर पोलीस यंत्रणा यामागे कोणते गुन्हेगार सक्रिय आहेत, याचा तपास सुरू करतात. प्रत्येक गुन्हेगाराची गुन्हय़ाची एक वेगळी पद्धत असते. कोण कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करतो तर आणखी कोण खिडकीचे ग्रिल कापून चोरी करतो. गुन्हय़ाच्या पद्धतीवरून गुन्हेगारी टोळय़ांचा माग काढला जातो. प्रकाशची पद्धतही ठरलेली आहे. नेहमी बंद घरे तो आपले लक्ष्य बनवितो.
एखाद्या गुन्हय़ानंतर मोबाईल टॉवर लोकेशनवरूनही गुन्हेगारांचा शोध घेतला जातो. याची कल्पना असल्यानेच प्रकाश हा गुन्हेगारीत उतरल्यानंतर मोबाईलचा वापरच कमी करतो. त्यामुळे या गुन्हय़ात तो आहे की नाही किंवा सध्या त्याचा ठावठिकाणा कोठे आहे, याचा शोध घेणेही तपास अधिकाऱयांना कठीण जाते. अशी त्याची ख्याती आहे. एकदा पोलिसांना सापडला तर त्याला पकडणाऱया अधिकाऱयाला अक्षरशः जॅकपॉट
लागतो.
प्रत्येक वेळेला किमान पाऊण किलो सोने जप्त
काही प्रकरणात गुन्हेगारांना पकडल्यानंतर त्याने विकलेला मुद्देमाल जप्त करण्याचे मोठे आव्हान तपास अधिकाऱयांसमोर असते. प्रकाश पाटीलच्या बाबतीत मात्र अधिकाऱयांचा अनुभव वेगळा आहे. कोणत्या घरात, कोणत्या दिवशी आपण चोरी केली आहे, त्या मुद्देमालाची विल्हेवाट कोठे लावली आहे, याचा तपशीलच तो तपास अधिकाऱयांना देतो. त्यामुळे प्रत्येक वेळेला किमान पाऊण ते एक किलो सोने त्याच्याजवळून जप्त केले जाते.
6 डिसेंबर 2020 रोजी झाडशहापूरजवळ शेतवाडीत प्रकाशला पाठलाग करून स्थानिक नागरिक व बेळगाव ग्रामीणच्या दोन पोलिसांनी पकडले. त्यावेळी त्याने पोलिसांना चाकूचा धाक दाखविला होता. त्याच्याजवळ पिस्तूलही होते. चोरीसाठी बाहेर पडताना बनावट नंबरप्लेटही तो सोबत आणतो. एखाद्या सीसीटीव्ही कॅमेऱयात जर कारची नंबरप्लेट कैद झाली असेल तर परत जाताना कारची नंबरप्लेट बदललेली असते. त्याच्या बॅगमधून वाहन क्रमांक लिहिलेल्या स्टीकरचा गठ्ठाच पोलिसांनी जप्त केला होता.
गोव्यात जगतोय ऐषोरामी जीवन
बंद घराचा कडीकोयंडा तोडण्यासाठी लागणारी अवजारे त्याच्या बॅगमध्ये असतात. चैनीसाठी गुन्हेगारीत उतरलेला हा युवक गोव्यात ऐषोरामी जीवन जगतो. सध्या अशी पार्श्वभूमी असलेला प्रकाश व त्याचा साथीदार महेश हे दोघे हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेत आहेत. वेगवेगळय़ा चोरी प्रकरणांच्या तपासासाठी पोलीस कोठडीत घेण्याची प्रक्रिया आता सुरू होणार आहे. या प्रकरणातून बाहेर पडल्यानंतर तो पुन्हा याच मार्गाला लागू नये, यासाठी पोलीस कोणती उपाययोजना करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘तरुण भारत’ने दिलेला सावधानतेचा इशारा ठरला खरा
प्रकाश पाटील हा बेळगावात पुन्हा सक्रिय झाला आहे, याविषयी सहा महिन्यांपूर्वी तरुण भारतने नागरिक व पोलीस यंत्रणेला सावध केले होते. 4 एप्रिल 2022 रोजी ‘चोर-पोलीस खेळ, बसेना तपासाचा मेळ’ या मथळय़ाखाली प्रकाशच्या छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. बेळगावात अधूनमधून तो दिसल्याचाही उल्लेख करण्यात आला होता. प्रकाश व त्याच्या साथीदाराच्या अटकेने ‘दै. तरुण भारत’ने दिलेला सावधानतेचा इशारा खरा ठरला.