अध्यक्षपदी संजय पाटील तर सचिवपदी विजय बनसूर यांची फेरनिवड
प्रतिनिधी /बेळगाव
माझी संघटना माझी जबाबदारी म्हणून प्रत्येकाने कार्य केले तर नक्कीच ती संघटना नावारुपाला येते. नूतन अध्यक्ष आणि संचालक मंडळींनी समाजाप्रती निष्ठा ठेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर व्हा, असा सल्ला जायंट्स फेडरेशनचे विभागीय संचालक मदन बामणे यांनी दिला.
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन आयोजित अधिकारग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर नूतन अध्यक्ष संजय पाटील, विशेष समिती सदस्य मोहन कारेकर, माजी अध्यक्ष सुनील भोसले, सचिव विजय बनसूर होते. स्वागत फेडरेशनचे संचालक शिवराज पाटील यांनी केले.
कोविडमुळे 2021-22 सालाकरिता पुन्हा संजय व त्यांच्या सहकाऱयांची फेरनिवड करण्यात आली. अधिकारग्रहण अधिकारी म्हणून मदन बामणे यांनी प्रथम नूतन सदस्य पद्मप्रसाद हुली यांना शपथ दिली. त्यानंतर संचालक राजू बांदिवडेकर, अनिल चौगुले, राहुल बेलवलकर, दिगंबर किल्लेकर, भाऊ किल्लेकर, अजित कोकणे, अनंत हावळ, सुनील चौगुले, मधू बेळगावकर, पुंडलिक पावशे यांना शपथ दिली. अंतर्गत उपाध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, बाहय़ उपाध्यक्ष सुनील मुतगेकर, खजिनदार लक्ष्मण शिंदे, सचिव विजय बनसूर यांनी शपथ घेतली.
अध्यक्षपदाची शपथ संजय पाटील यांना देण्यात आली. नूतन संचालक मंडळाचे अभिनंदन पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. मोहन कारेकर, सुनील भोसले व डॉ. विनोद गायकवाड यांनी शुभेच्छापर विचार व्यक्त केले. यावेळी जायंट्स सखीच्या पदाधिकारी, जायंट्स मेनचे सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन लक्ष्मण शिंदे यांनी केले.