प्रतिनिधी /बेळगाव
कोव्हिड काळातील परिस्थितीची जाण ठेऊन कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी स्वतः कोव्हिड पॉझिटिव्ह होऊनसुद्धा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून मराठा मंदिर येथे आयसोलेशन सेंटर उभारून शेकडो रुग्णांवर उपचार मिळावेत यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावलेले मदन बामणे हे खरेखुरे कोरोना योद्धे म्हणून कौतुकास पात्र आहेत, असे उद्गार साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांनी काढले. जायंट्स मेनच्यावतीने आयोजित विविध जणांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते.
जवळपास दोन महिने आपल्या जीवाची पर्वा न करता 24 तास फक्त आणि फक्त कोव्हिड रुग्णांसाठी कार्य करत असताना शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या माध्यमातून मदन बामणे यांनी मदत केल्याचे त्यांनी सांगितले. व्यासपीठावर अध्यक्ष संजय पाटील, विशेष समिती सदस्य मोहन कारेकर, माजी अध्यक्ष सुनील भोसले आणि सचिव विजय बनसूर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते मदन बामणे, कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य डॉ. विनोद गायकवाड, मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या राजू जैन, सुवर्णलक्ष्मी सोसायटीच्या संचालकपदी निवड झालेले राजू बांदिवडेकर आणि बेळगाव शहरात अनेक उद्याने निर्माण केलेले कंत्राटदार शिवकुमार हिरेमठ यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास जायंट्सचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन खजिनदार लक्ष्मण शिंदे यांनी केले.