प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाची धास्ती आहेच मात्र त्यातही माणुसकी अजूनही टिकून आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव आणि परिसरात अनेक संघटना आपापल्यापरीने मदत करत असतानाच बेळगाव ग्रामीण येथील अगसगा-आंबेवाडी रोडवरील खडीमशीनवरील लमानी समाजातील कुटुंबांना जायंट्स सखीच्यावतीने मदत करण्यात आली. या भागात मदत पोहोचली नसल्याचे समजताच सखींनी पुढाकार घेत संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत मदत दिली आहे.
अध्यक्षा नम्रता महागांवकर यांच्या पुढकारातून व ज्योती अनगोळकर, नीता पाटील, चंद्रा चोपडे, सुलोचना कुट्रे, सुलक्षणा शिनोळकर आणि ज्योती सांगुकर यांनी आपल्यापरीने साखर, चहापावडर, तेलाची पाकिटे, गूळ, कांदे, बटाटे, मिठाची पाकिटे, भाजीपाला, गहू, तूरडाळ असे जीवनावश्यक साहित्य देत पंधरा दिवस पुरेल इतके जीवनावश्यक साहित्याचे कीट तयार करून मदतीचा हात दिला आहे.
यावेळी सर्व वस्तूंचे वितरण करताना सामाजिक अंतर ठेऊन प्रशासनाच्या आवाहनाचे पालन करत जीवनावश्यक साहित्य वितरित करण्यात आले खडीमशीनवर काम करणाऱया कुटुंबापर्यंत मदत पोहोचली नसल्याने जायंट्स सखीने दिलेला मदतीचा हात उपयुक्त ठरला आहे. यावेळी स्पे कमिटी सदस्य मोहन कारेकर, शितल पाटील, मदन बामणे जायंट्स मेनचे माजी अध्यक्ष उमेश पाटील, मधू बेळगावकर उपस्थित होते.