राज्यस्तरीय ज्युनिअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये यश
प्रतिनिधी/ सातारा
लहान गटापासून धावणे क्रीडा प्रकारात सातत्याने यश मिळवत राज्यस्तरावर दहा वेळा सुवर्ण पदके पटकावणाऱया जावली एक्सप्रेस सुदेष्णा शिवणकर हिने पुणे येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये बाजी मारलीय. 100 व 200 मीटर धावणे प्रकारात सुदेष्णाने अकराव्या वेळी दोन सुवर्ण पदके पटकावत यशाची कमान उंचावत ठेवली आहे. यामुळे तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने सातारकरांची मान उंचावली आहे.
दि. 19 व 20 रोजी या कालावधीत पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर ऍथलेटीक्स चॅम्पीयनशिप 2021 मध्ये झालेल्या 18 वर्षाखालील मुलीच्या 100 व 200 मीटर धावणे क्रीडा प्रकारात सुदेष्णा हणमंत शिवणकर हिने प्रथम क्रमांक मिळविला आहे. 100 मिटर धावणे क्रिडा प्रकारात 11.62 सेकंदाची वेळ नोंदवत मुलीच्या 18 वर्षाखालील वयोगटात नवीन विक्रम नोंदवला आहे. तसेच 200 मीटर धावणे प्रकारात 24.56 सेकंद अशी वेळ देवून दोन्ही प्रकारात सुवर्ण पदक पटकवली आहेत.
दि. 25 रोजी भोपाळ (मध्यप्रदेश) व दि. 6 फेब्रुवारी रोजी गुहाटी (आसाम) येथे होणाऱया राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे. सुदेष्णाला तिचे कोच बळवंत बाबर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. साताऱयात सध्या सरावासाठी मैदान उपलब्ध नसल्याने सराव करणे अत्यंत अवघड होत आहे. तरीही या जावली एक्सप्रेसने अप्रतिम कामागिरी केली आहे.
सुदेष्णा शिवणकर मूळ खर्शी (ता. जावली) गावची आहे. तिचे वडील हणमंत शिवणकर सातारा पोलीस दलात आहेत. सुदेष्णा यशवंतराव चव्हाण इन्स्टिटय़ुट ऑफ सायन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून बारावीच्या वर्गात शिकत आहे. तिचे पूर्व माध्यमिक शिक्षण गुरुकूल स्कूलमध्ये झाले आहे. या यशाने जिल्हय़ाच्या क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.