प्रतिनिधी/ सातारा
जावली बँकेतील संचालक मंडळ, व्यवस्थपाक तसेच कर्ज विभाग प्रमुख यांनी संगनमताने खात्यातून मोठय़ा रकमेचा अपहार केल्याचा आरोप करत स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱया वाढे, ता. सातारा येथील एक महिलेसह दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी विशाल सुधाकर नलवडे व त्यांची पत्नी ज्योती विशाल नलवडे दोघे, रा. कुपर कॉलनी, सदरबझार, सातारा, राहूल सुधाकर नलवडे रा. वाढे, ता. सातारा यांनी जावली बँकेने त्यांच्यावर केलेल्या अन्यायाबाबत न्याय मागण्यासाठी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
स्वातंत्र्यदिनी या तिघांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 9 च्या सुमारास अंगावर रॉकेलसारखे द्रावण ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेवून त्यांना रुग्णालयात पाठवले. या तिघांनीही आत्मदहनाचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून याबाबत पोलीस नाईक दीपक पोळ यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. याबाबत जावली बँकेकडून संबंधित नेमका काय अन्याय झाला आहे. या तक्रारीची कायदेशीर मार्गाने खातरजमा करुन घेवून मग पोलीस दलाकडून ऍक्शन घेण्यात येईल, अशी माहिती पोलीस मुख्यालयातून देण्यात आली आहे.