मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले स्पष्ट
प्रतिनिधी / मडगाव
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी नोकरभरतीवर बंदी घालणारा आदेश जारी केला होता. त्यामुळे नोकरभरती लांबणीवर पडली होती. हा बंदीचा आदेश सरकारने हटविला असून सरकारने सद्या विविध खात्यात नोकरभरती करण्यासाठी वृत्तपत्रातून जाहिरात दिली होती. त्या सर्व जागा भरल्या जाणार असून त्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगावात पत्रकारांशी बोलताना दिली.
कोविड-19 नियंत्रणात आल्यानतंर नोकर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांच्या परीक्षा व मुलाखती घेतल्या जातील. साधारपणे जुलै महिन्याच्या मध्यावर परीक्षा व मुलाखती होतील. सरकारच्या विविध खात्यात नोकर भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. त्या सर्व जागा भरल्या जातील असे मुख्यमंत्री म्हणाले.
ऑनलाईन वर्गासाठीचा निर्णय शिक्षण संचालक घेतील
यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी 21 जून पासून ऑनलाईन वर्ग घेत जातील अशी घोषणा करण्यात आलेली आहे. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सद्या दहावी व बारावीचा निकाल तयार करण्यात राज्यातील सर्व हायस्कूल व उच्च माध्यमिक शिक्षकवर्ग व्यस्थ आहेत. एकदा दहावी व बारावीच्या निकालाची प्रक्रिया पूर्ण झाली की, शिक्षण संचालक ऑनलाईन वर्गासदंर्भातील निर्णय घेतील. शिक्षकांनी वर्ग हायस्कुलात येऊन घ्यावे की, घरातून या संदर्भातील निर्णय देखील शिक्षण संचालक घेणार आहेत. राज्यातील अनेक भागात अद्यापही नेटवर्कची गंभीर समस्या असून या समस्येचा अभ्यास करूनच ऑनलाईन वर्ग शाळेतून घ्यावे की घरातून याचा निर्णय शिक्षण संचालक घेतील असे मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी सरकारने आयव्हर्मेक्टिन गोळय़ा खरेदी केल्या. या खरेदीत घोटाळा झाल्याची चर्चा सद्या राज्यात सुरू आहे. या संदर्भात पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना छेडले असता, मुख्यमंत्र्यांनी अधिक बोलणे टाळले व म्हणाले की, आरोग्यमंत्र्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण केलेले आहे.