पाच राज्यांमधील सभांवर 22 जानेवारीपर्यंत निर्बंध : ‘व्हर्च्युअल’वरच भर देण्याचे आयोगाचे निर्देश
नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
पाच राज्यांमध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीदरम्यान जाहीर प्रचाराला अनुमती देण्यास निवडणूक आयोगाने नकार दर्शवला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आयोगाने 22 जानेवारीपर्यंत रॅलींवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जाहीर सभांना ‘लॉक’ लावले असले तरी इनडोअर बैठकीसाठी 300 लोकांना किंवा हॉलच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाने सर्व पक्ष आणि उमेदवारांना डोअर टू डोअर प्रचारासाठी परवानगी दिली असून व्हर्च्युअल माध्यमातून उमेदवारांना प्रचार करता येणार आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना 8 जानेवारी रोजी आयोगाने रॅली, सभा, रोड शो, सायकल आणि बाईक रॅली यासारख्या जाहीर प्रचारावर बंदी घातली होती. फक्त सोशल मीडियावर प्रचार करण्यास परवानगी दिली होती. 15 जानेवारीला ही मुदत संपत असताना आयोगाने व्हर्च्युअल प्रचारावर अधिक भर देण्याचे निर्देश राजकीय पक्षांना दिले होते. कोरोना संसर्गवाढीमुळे ही मनाई निवडणूक आयोगाने 22 जानेवारीपर्यंत कायम ठेवली आहे. शनिवारी निवडणूक आयोगाने याबाबतची माहिती दिली. कोरोना संसर्गाचे आकडे वाढत असल्याने निवडणूक आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला. बंद हॉलमध्ये 300 जण अथवा एकूण क्षमतेच्या 50 टक्के लोकांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यास निवडणूक आयोगाने अनुमती दिली आहे.
कोरोना महामारी आणि ओमिक्रॉन संकटामध्ये उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणाऱया पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
निवडणूक राज्यांमध्ये कोरोना संसर्गात वाढ
गेल्या सहा दिवसातील कोरोनाचा संसर्ग पाहिल्यास उत्तर प्रदेश आणि पंजाब या दोन मोठय़ा निवडणूक राज्यांमध्येच कोरोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 8 जानेवारी रोजी 6,401 नवे रुग्ण सापडले होते. मात्र, 14 जानेवारी रोजी हा आकडा 15,975 पर्यंत वाढला आहे. त्याचप्रमाणे 8 जानेवारी रोजी 3,560 नवे रुग्ण सापडलेल्या पंजाबमध्ये 14 जानेवारी रोजी 7,552 नवे रुग्ण सापडले. या वाढत्या रुग्णसंख्येमुळेच निर्बंध वाढवण्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला आहे.