प्रतिनिधी / फलटण :
फलटण तालुक्यातील जिंती गावामध्ये गेल्या पंधरा दिवसात डेंग्यू आजाराने डोके वर काढले आहे. आतापर्यंत जिंती गावामध्ये 100 हून अधिक रुग्ण डेंग्यूचे रुग्ण आढळले असून, ही रुग्णसंख्या वाढत आहे.
बऱ्याच रुग्णांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतले. त्यांचे बिल कमीत कमी 30 ते 40 हजार रुपये होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. डेंग्यू आजाराचा फैलाव कमी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी गावामध्ये आरोग्य तपासणी केंद्र तयार करून डेंग्यू प्रसार कसा कमी होईल यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
ग्रामपंचायतमधील एसटी स्टँडवरील पाण्याची टाकी गेल्या अनेक दिवसापासून धुतली नसल्याने डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पावसाचे पाणी तसेच झाडेझुडपे व काही ठिकाणी तर सांडपाणी साचलेले दिसून येते. त्यामुळे रोगराई प्रसार होण्यास आमंत्रण मिळत आहे. एकाच घरातील चार-पाच रुग्ण डेंग्यूने त्रस्त झाले असल्याने फलटण, बारामती शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागेल आहे. काही रूग्णांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.