ऑनलाईन टीम / ठाणे :
महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा आज वाढदिवस. त्यांनी आज वयाची 55 वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने जणू कोरोनाग्रस्तांसाठी जीवनदानाचा संकल्प करत त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी प्लाझ्मा दान केले.
जितेंद्र आव्हाड यांनी आज ठाण्यातील ‘ब्लड लाईन’ रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मादान केले. तसेच कोरोनामुक्त झालेल्या सर्वच व्यक्तींनी प्लाझ्मादान करावे, जेणेकरुन इतर रुग्णांना त्याचा लाभ होईल, असे आवाहन यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केले. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आज राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनीदेखील प्लाझ्मादान केले.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आव्हाड यांनी घेतला होता. ठाणे शहरात कोणत्याही प्रकारचे होर्डींग्ज लावू नये, त्याऐवजी कोविड योद्ध्यांना आणि गोरगरीब जनतेला लाभदायक उपक्रम राबवा, असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार, कार्यकर्त्यांनीही ठिकठिकाणी अन्नधान्य वाटप, सॅनिटायझर, मास्कवाटप असे उपक्रम आज राबवले.