ऑनलाईन टीम / मुंबई :
म्हाडा भरती परीक्षा रद्द झाल्यामुळे भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शने केली. अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू असतानाच राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात घोषणबाजी सुरु होती. यावेळी दोन्ही गटात राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत अभाविपच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तर राष्ट्रवादीच्या गुंडांनी आम्हाला मारहाण केल्याचा आरोप अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने म्हाडा परीक्षेतील गैरप्रकार रविवारी उघडकीस आणला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही परीक्षा रद्द केली. या प्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटकही करण्यात आली आहे. मात्र, या प्रकारानंतर भाजप आक्रमक झाली आहे.
भाजपप्रणित अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सकाळी जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर ठिय्या मांडून आव्हाड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही प्रचंड संतापले. यावेळी अभाविप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. अभाविपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या गुंडांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच पेपरफुटीप्रकरणी आव्हाड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.