हरिद्वार धर्म संसदेतील वादग्रस्त भाषणाचे प्रकरण
वृत्तसंस्था / हरिद्वार
जितेंद्र नारायण त्यागी उर्फ वसीम रिझवी यांना पोलिसांनी गुरुवारी वादग्रस्त भाषणाप्रकरणी अटक केली आहे. हरिद्वारमध्ये धर्मसंसद आयोजित करत एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक रहिवाशाच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता.
जितेंद्र नारायण त्यागी उर्फ वसीम रिझवी, साध्वी अन्नपूर्णा यांच्यासह अन्य अनेक संतांची नावे यात नोंद आहेत. नारसन सीमेवरून हरिद्वार पोलिसांनी जितेंद्र सिंह त्यागी यांना अटक केली आहे. स्वामी यती नरसिंहानंद सरस्वती हे त्यागींसोबत कारवाईवेळी उपस्थित होते. पोलिसांनी सध्या केवळ त्यागी यांनाच याप्रकरणी अटक केली आहे. रिझवी शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत.
हरिद्वार येथील धर्मसंसदेचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड सरकारला नोटीस बजावून 10 दिवसांमध्ये भूमिका मांडण्यास सांगितले आहे. याप्रकरणी वादग्रस्त भाषणे करणाऱया लोकांच्या विरोधात चौकशी तसेच कारवाई करण्याचा निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी उत्तराखंड पोलिसांकडून स्थापन विशेष तपास पथकाने 12 जणांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. हरिद्वारमध्ये धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले होते. या धर्मसंसदेत हिंदुत्व आणि मुस्लिमांवरून साधूसंतांच्या वादग्रस्त भाषणांच्या चित्रफिती सोशल मीडियावर प्रसारित झाल्या होत्या. या कथित चित्रफितींमध्ये संत आणि धर्मगुरुंनी धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र हाती घेण्याचे विधान केल्याचे दिसून येते.