81 वर्षांपासून परंपरा : तिसरी पिढी कार्यरत : जादूच्या प्रयोगांना वैज्ञानिक आधार, प्रयोगांना उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या 81 वर्षांपासून पिढीजात जादूचे प्रयोग करण्याची परंपरा रघुवीर कुटुंबीयांनी जपली आहे. आजोबा जादूगार रघुवीर, वडील विजय रघुवीर आणि जितेंद्र रघुवीर तिसरी पिढी जादूची कला सादर करीत आहेत. आजोबा आणि वडिलांची प्रेरणा घेत 27 देशांमध्ये जादूचे प्रयोग सादर केले आहेत. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्यावतीने न्यूयॉर्क येथे 10 ते 14 ऑगस्ट दरम्यान अधिवेशन होणार आहे. येथेही दोन दिवस जादूचे प्रयोग होणार असल्याची माहिती जगप्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
आजोबा आणि वडिलांकडून प्रेरणा घेताना विविध प्रकारचे जादूचे प्रयोग आत्मसात करण्यास मिळाले. 2005 ते 2012 पर्यंत नोकरी सांभाळत जादूचे प्रयोग केले. दरम्यान 2012 नंतर नोकरी सोडून पूर्णवेळ जादूचे प्रयोग सादर करण्यास प्रारंभ केला. नवनवीन प्रयोग सादर करताना कर्नाटक, महाराष्ट, गोवासह संपूर्ण भारत देशासह आणि अमेरिका, दुबई, मलेशिया, रशिया, कॅनडा, थायलंड, ऑस्टेलिया यासह 27 देशांमध्ये प्रयोग सादर केले. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून काळानुरुप प्रयोग सादर करत आहोत. यावेळी अंधश्रद्धा दूर करण्याचेही काम होत आहे. काहीवेळा आपले प्रयोग पाहून आपले आजार दूर करण्यासाठी उपाय सूचवा असे सल्ले अनेकांनी मागितले आहेत. यावेळी त्यांना तज्ञ डॉक्टरांकडे किंवा त्यातील जाणकारांकडे जाण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले.
बेळगावातील 15,724 वा जादूचा प्रयोग
बेळगाववासियांनी माझ्या कलेला भरभरून दाद दिली आहे. पैसा मिळविणे हा उद्देश न ठेवता आपली कला सादर करून लोकांचे मनोरंजन करणे, त्या निखळ मनोरंजनातून लोकांना हसविणे आणि काहीकाळ त्यांना आपल्या दुःखाचा विसर पडावा हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. बेळगाव येथे होत असलेला 81 वर्षातील 15,724 वा जादूचा प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगाव येथील जादूचे प्रयोग रंगले
जगप्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांचे जादूचे प्रयोग रविवारी गोगटे रंगमंदिर येथे उत्साहात पार पडले. यावेळी त्यांनी एकापेक्षा एक सुंदर जादूचे प्रयोग सादर करून प्रेक्षकांची वाहव्वा मिळविली. प्रारंभी फुल, घडय़ाळ, पत्ते, फ्रेम, बाटॅल यासह इतर प्रयोग सादर करून उपस्थित रसिकांना आश्चर्यचकीत केले. कोरोनामुळे बऱयाच काळानंतर शहरात झालेले जितेंद्र रघुवीर यांचे जादूचे प्रयोग रंगले.
यावेळी त्यांनी आपल्या जादुच्या प्रयोगांमध्ये नवीन पद्धतीनुसार माणसांचे दोन तुकडे करून परत जोडणे, रिंग ओ मॅजिक, स्वॉर्ड कॅबिनेट मायक्रोवेव्ह मॅजिक, आर्म इल्युजन, हुदिनी बॉक्स, टय़ुब झ्याक, प्रेक्षकांतील मुलगी हवेत अधांतरी, नोटांचा पाऊस, फ्रेंच गुईलोटाईन, स्टेजवरून क्षणाधार्थ माणूस गायब, मास्टर ऑफ प्रेडिक्शन आदी प्रयोग सादर करून रसिकांची वाहव्वा मिळविली. या प्रयोगामध्ये सुमधूर संगीत, अरेबिक जादुचे चित्तथरार प्रयोग सादर झाले. या प्रयोगांद्वारे पालक व बालकांना नवनवीन जादूचे प्रयोग अनुभवता आले. यावेळी पालक, लहान बालक बहुसंख्येने उपस्थित होते. या जादूचा प्रयोग पाहून प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला.