सहसरचिटणीसपदी विक्रम जैन यांची निवड
प्रतिनिधी / बेळगाव
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जितो-कर्नाटक आणि बेळगाव) राष्ट्रीय संचालकपदी बेळगावचे चार्टर्ड अकौंटंट सतीश मेहता व विक्रम जैन यांची सह सरचिटणीसपदी निवड झाली आहे.
जितोच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर एकूण 42 संचालक असून संस्थेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. जितो ही जैन समाजाची मोठी सामाजिक संघटना असून त्यामध्ये जैन, दिगंबर, श्वेतांबर, मंदिरमार्गी व स्थानकवासी यांचा समावेश आहे. सर्व जैन धार्मिकांना एकाच छताखाली आणणारी ही संस्था असून समाज बांधवांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविते. संस्थेच्या भारतात 67 तर परदेशात एकूण 11 शाखा आहेत. याचबरोबर महिला आणि युवा विभाग वेगळा आहे.
संस्था प्रशिक्षण, व्यावसायिक कार्यशाळा, नोकरीच्या संधी, वधू-वर मंडळ, बँक परीक्षा तसेच प्रशासकीय परीक्षांची तयारी असे विविध समाजाभिमुख उपक्रम राबविते. पूर, दुष्काळ तसेच कोरोना काळात जितोने असंख्य नागरिकांपर्यंत मदत पोहोचविली.
सीए सतीश मेहता व विक्रम जैन या बेळगावच्या दोन नागरिकांची राष्ट्रीय स्तरावर होणारी निवड ही बेळगावच्या जितो शाखेने केलेल्या उत्तम कार्याची पोचपावती आहे. सतीश मेहता यांनी यापूर्वी जितोमध्ये चेअरमन, प्रमुख सचिव व खजिनदार ही पदे भूषविली आहेत.
चार्टर्ड अकौंटंट संघटनेचे ते चेअरमन असून यापूर्वी त्यांनी सचिव व खजिनदार ही पदे भूषविली आहेत. विक्रम जैन यांनी रोटरी क्लब वेणुग्रामचे अध्यक्ष म्हणून काम केले असून 2021-22 मध्ये उपप्रांतपाल म्हणून त्यांना नामांकन मिळाले
आहे.