प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीच्या काळात कोरोना रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी तसेच मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळताना अडचणी येत आहेत, हे लक्षात घेऊन जितो लेडिज विंगने एक खास व्हॅन घेतली आहे. दि. 17 मे रोजी ही व्हॅन महावीर भवन येथे जिव्हाळा फौंडेशन बेळगाव या सेवाभावी संस्थेकडे सेवेसाठी सोपविण्यात आली.
जितो लेडिज विंगच्या अध्यक्षा अरुणा शहा व कार्यवाह शिल्पा हजारे यांनी व्हॅनचे पूजन केले. जितो मेन विंगचे अध्यक्ष सुनील कटारिया, कार्यवाह अंकित खोडा यांनी पुष्पहार घालून व्हॅनचे उद्घाटन केले. जिव्हाळा फौंडेशनच्या डॉ. सविता कद्दू व माधुरी जाधव यांच्याकडे ही व्हॅन सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी जिव्हाळा फौंडेशन प्रामाणिकपणे सेवा देऊन बेळगावकरांना मदत करतील, अशी अपेक्षा अरुणा शहा यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी जितोच्या राष्ट्रीय समन्वयक भारती हरदी, शिल्पा शहा, राहुल हजारे, महेंद्र परमार उपस्थित होते. शिल्पा हजारे यांनी सर्वांचे आभार मानले. सदर व्हॅनसाठी डॉ. सविता कद्दू 9448141349 किंवा माधुरी जाधव 77602 66247 यांच्याशी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.