प्रतिनिधी : कराड / कोयना वसाहत
कराड तालुक्यातील किरपे येथे दोन दिवसापूर्वी पाच वर्षाच्या बालकावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला होता. बिबटय़ाला शोधण्यासाठी वनविभागाने सापळा लावला असून गस्तही सुरू केल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र बिबटय़ा शेतकरी, ग्रामस्थांना वारंवार दिसत आहे. पण वनविभागाला सापडत नाही. बिबटय़ा वारंवार शिवारात येत असल्याने शेतकरी, ग्रामस्थ धास्तावले असून त्यांच्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
कराड तालुक्यातील येणके, किरपे भागात बिबटय़ाच्या जीवघेण्या हल्ल्याची मालिका संपता संपेना. यातच गुरूवारी किरपे येथे पाच वर्षांच्या राज देवकर या मुलावर बिबटय़ाने जीवघेणा हल्ला केला. बिबट्याच्या तावडीतून मुलाला त्याच्या वडिलांनी जिगरबाजपणा दाखवत वाचवले. मात्र बिबटय़ाने मुलाला गंभीर जखमी केले. दरम्यान शुक्रवारी दक्षिण तांबवे येथे बिबटय़ाचे ग्रामस्थांना दर्शन झाले. याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. त्यानंतर शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास किरपे येथे ज्या परिसरात मुलावर बिबटय़ाने हल्ला केला. त्याच परिसरातील सुतारकी येथे संतोष तिकवडे यांच्या शेतात ऊसतोड सुरू होती. त्यावेळी अचानक बिबटय़ा ऊसतोड मजूरांच्या समोर आला. घाबरलेल्या ऊसतोड मजुरांनी ऊसतोड बंद करत सावध पवित्रा घेतला. या घटनेमुळे मजुरांनी ऊसतोड बंद केली आहे. ऊसतोड मजुरांसह शेतकरी यांना बिबटय़ा दिसत असताना वनविभागाला तो कसा दिसत नाही याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कराड तालुक्यातील तांबवे, किरपे, येणके परिसरात गेल्या अनेक दिवसापासून बिबटय़ाचा वावर आहे. याबाबत स्थानिक नागरिकांकडून वनविभागाला सापळा लावून बिबटय़ा जेरबंद करण्याची मागणी केली जात आहे. तरीही सापळा लावण्याची परवानगी घेण्याच्या कारणापासून वनविभागाचे रडगाणे सुरू होते असा आरोप होतोय.
बिबटय़ांची संख्या वाढलीय
कराड तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढली आहे. या वृत्ताला वनविभागाच्या अधिकारी यांनी यास दुजोरा दिला आहे. मात्र बिबट्यांच्या संख्येचे सर्वेक्षण झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही केले जात आहे.
झाडावर आढळली मृत मेंढी
येरवळे (ता.कराड) येथे एका झाडावर मृत मेंढी दिसून आल्याचे सांगितले आहे. यामुळे बिबटय़ाचा वावर
आहे याला दुजोरा मिळत आहे. दहा ते 15 दिवसांपूर्वीची घटना असल्याची शक्यता बोलली जात आहे. ऊस तोडकऱ्यांना झाडावर ही मृत मेंढी दिसली. येरवळे येथे ठाकराचा हिस्सा नावाच्या शिवारात ऊस तोडायला गेलेल्या तोडकऱ्यांना झाडावर मृत मेंढी पाहायला मिळाली. दहा ते पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने शिकार करून झाडावर ठेवली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.