संसदेत विधेयक सादर : क्षी जिनपिंग यांना अध्यक्ष न संबोधिण्याची तरतूद : चीनमध्ये लोकशाहीच नाही
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या संसदेत एक महत्त्वाचे विधेयक मांडण्यात आले आहे. या विधेयकात अमेरिकेत शासकीयदृष्टय़ा क्षी जिनपिंग यांना चीनचा अध्यक्ष न संबोधिण्याची तरतूद नमूद आहे. या विधेयकानुसार चीनमध्ये लोकशाहीच नाही आणि तसेच जिनपिंग हे लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले नेते नव्हेत. याचमुळे अमेरिकेने त्यांना अध्यक्ष संबोधिणे बंद करावे, अशी मागण विधेयकाद्वारे करण्यात आली आहे.
तांत्रिकदृष्टय़ा विधेयकातील प्रत्येक मुद्दा योग्य असल्याचे जाणकारांचे मत आहे. 1980 च्या पूर्वी कुठल्याही चिनी शासनप्रमुखाला अध्यक्ष म्हटले जात नव्हते. याचबरोबर चीनच्या घटनेतही ‘अध्यक्ष’ हा शब्द समाविष्ट नाही.
चेअरमन ऑफ एव्हरीथिंग
2012 मध्ये क्षी जिनपिंग चीनचे सर्वेसर्वो ठरले होते. हे पद त्यांना चिनी कम्युनिस्ट पक्षाचा (सीसीपी) प्रमुख म्हणून मिळाले होते. चीनच्या घटनेनुसार सीसीपीचा अध्यक्षच सरकार आणि सैन्याचा प्रमुख असतो. परंतु जिनपिंग यांच्याप्रकरणी असा प्रकार नाही. जिनपिंग हेच सत्ता आणि पक्षाचे एकमात्र केंद्रबिंदू आहेत. ते पक्षाच्या नव्या सुपर कमिटीजचेही प्रमुख आहेत. याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय तज्ञ जिनपिंग यांना ‘चेअरमन ऑफ एव्हरीथिंग’ म्हणजेच ‘प्रत्येक गोष्टीचा अध्यक्ष’ म्हणू लागले आहेत. जिनपिंग यांनी एकप्रकारे चीनमध्ये हुकुमशाहीच प्रस्थापित केली आहे.
विधेयकातील तरतुदी
ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीचे खासदार स्कॉट पॅरी यांनी हे विधेयक मांडत याला ‘नेम द एनिमी ऍक्ट’ असे नाव दिले आहे. जिनपिंग किंवा कुठल्याही चिनी शासकाला अमेरिकेच्या शासकीय दस्तऐवजांमध्ये अध्यक्ष म्हणून नोंदविले जाऊ नये, अशी पॅरी यांची इच्छा आहे. विधेयकानुसार चीनमध्ये अध्यक्षासारखे कुठलेच पद नाही, तेथे कम्युनिस्ट पक्षाचा जनरल सेक्रटरी (महासचिव) असतो. महासचिवाला अध्यक्ष म्हणू लागल्यावर तो लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले लोकप्रतिनिधी वाटू लागतो. मात्र चीनमध्ये लोकशाहीच नाही.
वस्तुस्थिती…
जिनपिंग यांना ‘चीनचा अध्यक्ष’ म्हणून संबोधिणे एका अर्थाने चुकीचेच असल्याने अनेक वाद देखील झाले आहेत. चीनमध्ये ज्या पदांवर जिनपिंग आरुढ आहेत, त्यातील कुठल्याच पदाचे शीर्षक ‘अध्यक्ष’ असे नाही. तसेच चिनी भाषेत (मेंडेरिन) प्रेसिडेंट या शब्दाचा उल्लेख नाही. 1980 मध्ये चीनची अर्थव्यवस्था खुली झाल्यावर चीनच्या शासकाला इंग्रजीत पेसिडेंट संबोधिले जाऊ लागले. परंतु तांत्रिकदृष्टय़ा अशी स्थिती नाही. जिनपिंग हे सीसीपीचे प्रमुख असल्यानेच देशाचे मुख्य प्रशासक आहेत.
चीनमध्ये नागरी स्वातंत्र्य नाही
किमानपक्षी अधिकृत स्वरुपात चीनच्या शासकाला राष्ट्रपती किंवा अध्यक्ष संबोधिले जाऊ नये, अशी मागणी पॅरी यांच्यापूर्वीही अनेकांनी अमेरिकेत केली आहे. परंतु जिनपिंगच का असा प्रश्न टीकाकार उपस्थित करू लागले आहेत. चीनच्या कुठल्याही शासकाला अध्यक्ष म्हटल्याने तो लोकशाहीतून निवडून आलेला प्रतिनिधी असल्याचा संदेश जातो. चीनमध्ये लोकशाही नाही तसेच तेथील जनतेला मतदानाचा अधिकार नाही. जिनपिंग यांना अध्यक्ष संबोधिणे म्हणजे त्यांच्या हुकुमशाहीला मान्यता देणे असल्याचे युएस-चायना इकोनॉमिक अँड सिक्युरिटी रिव्हय़ू कमिशनच्या अहवालात म्हटले गेले आहे.
जिनपिंग यांच्याकडील पदे चीनमध्ये जिनपिंग यांच्याकडे तीन महत्त्वाची पदे आहेत. स्टेट चेअरमन (गुओजिया झुक्शी) अंतर्गत ते देशाचे प्रमुख शासक आहेत. चेअरमन ऑफ द सेंट्रल मिलिट्री कमिशन (झोंगयांग जुन्वेई झुक्शी) या नात्याने ते चीनच्या सर्व सशस्त्र दलांचे प्रमुख आहेत. जनरल सेक्रेटरी ऑफ द चायनीज कम्युनिस्ट पार्टी (झोंग शुजि) स्वरुपात ते सत्तारुढ पक्षाचे प्रमुख आहेत.