प्रतिनिधी / बेळगाव
जीएसएस कॉलेजमध्ये जिमखाना उपक्रम आणि विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम के. एम. गिरी सभागृहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ हे उपस्थित
होते.
अध्यक्षस्थानी एस. के. ई. संस्थेचे संचालक आर. डी. शानभाग उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. नागराज हेगडे, एस. के. ई. चे संचालक आर. डी. शानभाग, जिमखाना उपाध्यक्ष ए. ए. हलगेकर, शारीरिक शिक्षण शिक्षक प्रशांत मंकाळे उपस्थित होते. रितिका मदारच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य हेगडे यांनी स्वागत केले. प्रगती यामोजीने पाहुण्यांची ओळख करून दिली.
प्रा. ए. ए. हलगेकर यांनी 2020-21 मधील कार्यक्रमाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी हिरेमठ व आर. डी. शानभाग यांच्या हस्ते विद्यार्थी परिषदेच्या सर्व खात्यांच्या सचिवांना बॅच देण्यात आले. हिरेमठ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उत्तम नेतृत्वाचे महत्त्व व फायदे याबद्दल चर्चा केली. हे गुण मिळविण्याचे ठिकाण व वय कॉलेज जीवनाशिवाय दुसरे असू करत नाही, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी या सुंदर कॅम्पसचा फायदा घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे आपल्या भाषणात नमूद केले. आयुष्यात योग्य निर्णय घेणे किती महत्त्वाचे असते, ते उदाहरणे देऊन पटवून दिले.
आर. डी. शानभाग यांनी अध्यक्षीय समारोप केला. वैशाली साळुंखे हिने आभार मानले.