शिमोग्यातील हुणसोडू येथील क्वॉरीच्या क्रशरमध्ये दुर्घटना : 10 मजूर जखमी
प्रतिनिधी / बेंगळूर
शिमोगा शहरापासून काही अंतरावरच असलेल्या हुणसोडू येथील क्वॉरीच्या क्रशरमध्ये जिलेटिन कांडय़ांचा भीषण स्फोट झाला. या घटनेत 5 कामगारांचा मृत्यू झाला असून त्यातील चौघांची ओळख पटली आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून क्रशरच्या मालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
शिमोगा तालुक्यातील हुणसोडू येथील निर्जनस्थळी क्वॉरीजवळ ट्रकमधून आणण्यात आलेल्या 50 बॉक्स जिलेटिनच्या कांडय़ांचा गुरुवारी रात्री 10.30 वाजता भीषण स्फोट झाला. या घटनेमुळे आजुबाजूच्या खेडय़ांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रारंभी भूकंप झाल्याचा समज नागरिकांमध्ये होता.
रात्री उशिरा तपास केल्यानंतर क्रशरमध्ये साठवून ठेवण्यात आलेल्या जिलेटिनच्या कांडय़ांचा स्फोट झाल्याचे आढळून आले. क्वॉरीत स्फोट घडविण्यासाठी जिलेटिनच्या कांडय़ांचा वापर होतो. मात्र, गुरुवारी साठा करण्यात आलेल्या जिलेटिनच्या कांडय़ा बेकायदेशीरपणे जमा केल्याचे समजते. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत.
अनेक वाहनांचे नुकसान
स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की मृतदेहाचे तुकडे इतरत्र विखुरले होते. मृतदेहांची ओळख पटविणेही अवघड झाले. क्वॉरीजवळील ट्रक, बोलेरो जीपसह अनेक वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. क्रशरचे साहित्य अर्धा कि. मी. दूरपर्यंत उडून पडले. परिसरातील विद्युत खांबही जमीनदोस्त झाले आहेत. सदर घटनेची माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली.