शिमोगा – घटनास्थळी पाहणी करताना खाण-भूविज्ञान मंत्री मुरुगेश निराणी .
प्रतिनिधी / बेंगळूर
कर्नाटकातील शिमोगा शहरापासून काही अंतरावरच असलेल्या हुणसोडू येथील क्वारीच्या क्रशरमध्ये जिलेटीन कांडय़ांचा भीषण स्फोट झाला. या घटनेत 5 कामगारांचा मृत्यू झाला असून त्यातील चौघांची ओळख पटली आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून क्रशरच्या मालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
शिमोगा तालुक्यातील हुणसोडू येथील निर्जनस्थळी क्वारीजवळ ट्रकमधून आणण्यात आलेल्या 50 बॉक्स जिलेटिनच्या कांडय़ांचा गुरुवारी रात्री 10.30 वाजता भीषण स्फोट झाला. या घटनेमुळे आजुबाजूच्या खेडय़ांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रारंभी भूकंप झाल्याचा समज नागरिकांमध्ये होता. रात्री उशिरा तपास हाती घेण्यात आल्यानंतर क्रशरमध्ये साठवून ठेवण्यात आलेल्या जिलेटिनच्या कांडय़ांचा स्फोट झाल्याचे आढळून आले. क्वारीत स्फोट घडविण्यासाठी जिलेटिनच्या कांडय़ांचा वापर होतो. मात्र, गुरुवारी साठा करण्यात आलेल्या जिलेटिनच्या कांडय़ा बेकायदेशीरपणे जमा केल्याचे समजते. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत.
अनेक वाहनांचे नुकसान
स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की मृतदेहाचे तुकडे इतरत्र विखुरले होते. मृतदेहांची ओखळ पटविणेही अवघड झाले. क्वारीजवळील ट्रक, बोलेरो जीपसह अनेक वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. क्रशरचे साहित्य अर्धा कि. मी. दूरपर्यंत उडून पडले. परिसरातील विद्युत खांबही जमीनदोस्त झाले. घटनेची माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. मृतांपैकी चार जणांची ओळख पटली असून ते शिमोगा जिल्हय़ातीलच भद्रावती तालुक्यातील रहिवासी होते. तर एक बिहारमधील असल्याचे समजते. या क्वारीमध्ये बिहार, आसाममधील अनेक मजूर कामाला होते.
घटनेची माहिती मिळताच रात्रीच जिल्हाधिकारी के. बी. शिवकुमार, जिल्हा पोलीस प्रमुख शांतराजू व विविध खात्यातील अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट दिली. शिमोगा जिल्हा पालकमंत्री के. एस. ईश्वरप्पा, खाण-भूविज्ञान मंत्री मुरुगेश निराणी, खासदार बी. वाय. राघवेंद्र, आमदार के. बी. अशोक नायक यांनी देखील शुक्रवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. सध्या या ठिकाणी प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले असून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
डायनामाईटचा स्फोट?
गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी देखील या प्रकरणी कसून चौकशी करण्यात येईल, असे सांगितले आहे. क्वारीमध्ये डायनामाईटचा वापरही करण्यात येत होता. याचाच स्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. तपासानंतरच याविषयी स्पष्ट होणार आहे.