प्रतिनिधी / सांगली
शनिवारी कोरोनाचे नवीन पाच रूग्ण वाढले तर सहाजण कोरोनामुक्त झाले आहेत. आटपाडी तालुक्यातील झरे येथील 58 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात कोरोनाने आजपर्यंत पाच बळी गेले आहेत. जिल्हय़ात एकूण रूग्णसंख्या 148 झाली आहे. तर उपचारातील रूग्णसंख्या 56 आहे.
नवीन पाच रूग्ण वाढले
जिल्हय़ात शनिवारी कोरोनाचे पाच नवीन रूग्ण वाढले. त्यामध्ये कडेगाव तालुक्यातील नेर्ली येथील 50 वर्षीय व्यक्ती, वाळवा तालुक्यतील वाटेगाव येथील 58 वर्षीय व्यक्ती, खानापूर तालुक्यातील भिकवडी येथील 16 वर्षाचा मुलगा यांचा समावेश आहे. तर पलूस येथील 88 वर्षीय महिला आणि 55 वर्षीय व्यक्ती यांचा समावेश आहे.
सहा जण कोरोनामुक्त
शनिवारी खानापूर तालुक्यातील गोरेवाडी येथील 45 वर्षीय व्यक्ती, शिराळा तालुक्यातील निगडी येथील 30 वर्षीय व्यक्ती आणि रेड येथील 20 वर्षीय युवक, चिंचोळी येथील 43 वषीय व्यक्तीचा समावेश आहे. तर जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील 35 वर्षीय व्यक्ती आणि आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील 10 वर्षाची मुलगी कोरोनामुक्त झाली आहे. या सहाही जणांवर दहा दिवस उपचार करण्यात आले होते. उपचारानंतरचा त्यांचा स्वॅब निगेटीव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना आता संस्था क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
झरे येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू
आटपाडी तालुक्यातील झरे येथील 58 वर्षीय महिलेला एक जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. पण या महिलेस मधुमेह, थायरॉईड आणि ह्दयविकार असे आजार होते. कोरोनाची लागण झाल्यापासून य महिलेची प्रकृती चिंताजनक होती. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तसेच तिला व्हेंटीलेटरही लावला होता. शनिवारी सकाळी तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोनाने बळी गेल्याची संख्या आता पाच झाली आहे.
पलूस तालुक्यात कोरोनाचा शिरकाव
जिल्हय़ात आजपर्यंत कोरोनाचे रूग्ण सर्व तालुक्यात आढळून आले होते. पण पलूस तालुका कोरोनापासून दहा हात लांब होता. पण शनिवारी या पलूस तालुक्यातही कोरोनाने शिरकाव केला आहे. पलूस येथील 88 वर्षीय महिला आणि 55 वर्षीय व्यक्ती अशा दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.
सहा जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू
सध्या उपचारात असलेल्या सहा रूग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यामध्ये जत तालुक्यातील आवंढी येथील 55 वर्षीय व्यक्ती, खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील 60 वर्षीय व्यक्ती, शिराळा तालुक्यातील मणदूर येथील 81 वर्षीय आणि खिरवडे येथील 56 वर्षीय व्यक्ती कवठेमहांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथील 50 वर्षाची महिला यांच्यावर व्हेंटीलेटरवर उपचार सुरू आहेत. तर नांगोळे येथील 48 वर्षीय व्यक्तीवर ऑक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 148
बरे झालेले 87
उपचारात 56
मयत 05