इस्लामपूर, येलूर, रिळे, मणदूर येथे रूग्ण वाढले
चिंताजनक प्रकृती असणारे तिघेजण कोरोनामुक्त
एकूण रूग्णसंख्या 206 वर
प्रतिनिधी / सांगली
शुक्रवारी जिल्हय़ात नवीन चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. प्रकृती चिंताजनक असणारे तिघेजण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्हय़ाला दिलासा मिळाला आहे. एकूण रूग्णसंख्या 206 झाली आहे. तर उपचारातील रूग्णसंख्या 88 आहे.
इस्लामपूर, येलूर, रिळे आणि मणदूरमध्ये रूग्ण वाढले
शुक्रवारी वाळवा तालुक्यातील येलूर येथील 26 वर्षाची महिला, इस्लामपूर येथील 41 वर्षाची महिला, शिराळा तालुक्यातील रिळे येथील 13 वर्षाचा मुलगा आणि मणदूर येथील 16 वर्षाची मुलगी यांचे स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत. या सर्वांच्यावर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. मणदूरमधील रूग्णांची संख्या आता 32 वर पोहचली आहे. मणदूर येथील रूग्णसंख्या दररोज वाढतच चालली आहे.
चिंताजनक प्रकृती असणारे तिघेजण कोरोनामुक्त
कोरोना झाल्यापासून प्रकृती चिंताजनक असणारे तिघेजण शुक्रवारी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्हय़ातील सांगोला तालुक्यातील कडेबिसरी येथील 48 वर्षाची व्यक्ती, शिराळा तालुक्यातील खिरवडे येथील 56 वर्षाची व्यक्ती आणि मणदूर येथील 81 वर्षाची व्यक्ती हे तिघेजण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दहा दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा स्वॅब घेण्यात आला असता तो निगेटीव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले आहेत.
चौघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू
सध्या उपचारात असणाऱया रूग्णांपैकी खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील 60 वर्षीय व्यक्ती, कवठेमहांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथील 50 वर्षीय महिला, विटा-हनुमंतनगर येथील 34 वर्षीय व्यक्ती आणि कडेगाव तालुक्यातील वांगी येथील 69 वर्षीय व्यक्ती यांची प्रकृती मात्र अद्यापही चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आहेत.
त्या तिघांवर इतर आजारावरील उपचार सुरूः डॉ. साळुंखे
शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या तिन्ही रूग्णांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आता ते कोरोनामुक्त झाल्याने त्यांना असणाऱया इतर आजारांवर उपचार अद्यापही सुरू आहेत. त्यामुळे त्यांना आता कोरोनाच्या वॉर्डातून हलवून इतर वॉर्डात ठेवून उपचार सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 206
बरे झालेले 111
उपचारात 88
मयत 07